मुंबई प्रतिनिधी
गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगापासून संरक्षणासाठी देशव्यापी एचपीव्ही (HPV) लसीकरण मोहिमेचा मुंबईसह महाराष्ट्रात शनिवारी शुभारंभ करण्यात आला. बृहन्मुंबई महानगरपालिकाच्या वतीने मुंबई सेंट्रल येथील टोपीवाला राष्ट्रीय वैद्यकीय महाविद्यालय व बाई य. ल. नायर धर्मादाय रुग्णालय येथे झालेल्या कार्यक्रमात राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर, महापौर रितू तावडे व उपमहापौर संजय घाडी यांच्या हस्ते पाच लाभार्थी मुलींना लस देऊन मोहिमेची सुरुवात करण्यात आली.
राष्ट्रीय स्तरावर या मोहिमेचा प्रारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अजमेर (राजस्थान) येथून सकाळी केला. त्यानंतर राज्यस्तरीय कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण मुंबईत दाखविण्यात आले.
महापौर रितू तावडे यांनी पालकांना आवाहन करताना सांगितले की, “एचपीव्ही लस सुरक्षित असून मुलींना गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगापासून संरक्षण मिळते. पालकांनी निश्चिंतपणे मुलींना लसीकरणासाठी पुढे आणावे.”
तीन महिन्यांची विशेष मोहीम; २८४ केंद्रांवर सुविधा
महानगरपालिकेच्या माहितीनुसार, १४ वर्षे पूर्ण व १५ वर्षांखालील वयोगटातील सुमारे १.३० लाख मुली मुंबईत पात्र आहेत. पहिल्या टप्प्यात महानगरपालिका शाळांतील २४,९३६ मुलींना लस दिली जाईल. पुढील टप्प्यात खासगी व अनुदानित शाळांतील मुलींचा समावेश होणार आहे.
लसीकरणासाठी महानगरपालिकेची २३६ आरोग्य केंद्रे, २७ प्रसूतिगृहे, १६ सर्वसाधारण रुग्णालये व ५ वैद्यकीय महाविद्यालये – अशा एकूण २८४ संस्थांमध्ये सुविधा उपलब्ध राहणार आहे. पुढील तीन महिने विशेष मोहीम राबवून नंतर हा कार्यक्रम नियमित लसीकरणात समाविष्ट केला जाईल.
‘गार्डसिल-४’ची एक मात्रा; ‘यु-विन’वर नोंदणी
या मोहिमेत ‘गार्डसिल-४’ (Gardasil-4) या एचपीव्ही लसीची ०.५ मिली मात्रा डाव्या दंडात देण्यात येणार आहे. लसीकरणानंतर लाभार्थींची नोंदणी व प्रमाणपत्र वितरण ‘यु-विन’ (U-WIN) या केंद्र शासनाच्या डिजिटल पोर्टलवरून केले जाईल. पालकांची संमती आवश्यक असून लसीकरण ऐच्छिक आहे.
कर्करोग प्रतिबंधात महत्त्व
गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग हा ह्युमन पॅपिलोमा व्हायरस (HPV) संसर्गामुळे होतो आणि लसीकरणाने टाळता येणाऱ्या कर्करोगांपैकी एक आहे. भारतात महिलांमध्ये आढळणाऱ्या कर्करोगांमध्ये याचा दुसरा क्रमांक लागतो. त्यामुळे जागतिक आरोग्य संघटनाने एचपीव्ही लस राष्ट्रीय लसीकरण कार्यक्रमात समाविष्ट करण्याची शिफारस केली आहे.
सौम्य दुष्परिणाम शक्य
लसीकरणानंतर ताप, डोकेदुखी किंवा इंजेक्शनच्या ठिकाणी सूज अशी सौम्य लक्षणे दिसू शकतात; ती २–३ दिवसांत कमी होतात. गंभीर आजार, यीस्ट ॲलर्जी किंवा गर्भावस्था असल्यास लस देण्यात येणार नाही. प्रत्येक केंद्रावर प्रतिकूल घटना व्यवस्थापनासाठी वैद्यकीय अधिकारी उपलब्ध राहणार आहेत.
महानगरपालिकेने पालकांना आवाहन केले आहे की, पात्र वयोगटातील मुलींना या मोहिमेद्वारे लसीकरण करून भविष्यातील गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाचा धोका टाळावा.


