नाशिक, प्रतिनिधी
मराठी भाषेच्या अध्यापनाला नवतंत्रज्ञानाची जोड देत राज्यातील शाळांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय)-आधारित भाषा प्रयोगशाळा उभारण्याचा महत्त्वाकांक्षी उपक्रम सुरू असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी येथे केली. मराठी सक्तीची असली तरी तिचे अध्यापन सर्वत्र प्रभावी होत नसल्याची खंत व्यक्त करत त्यांनी “विद्यार्थ्यांच्या भाषिक कौशल्याचे वैज्ञानिक मूल्यमापन आणि संवादकौशल्य वृद्धी” हे या प्रयोगाचे उद्दिष्ट असल्याचे स्पष्ट केले.
विश्व मराठी संमेलनाच्या चौथ्या पर्वानिमित्त नाशिक येथे उभारलेल्या ‘कविश्रेष्ठ कुसुमाग्रजनगरी’त मराठी भाषा गौरव दिन सोहळा उत्साहात झाला. केटीएचएम महाविद्यालयाच्या प्रांगणातील ‘स्वातंत्र्यवीर सावरकर मुख्य मंचा’वर विविध साहित्य-भाषा पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.
एआय-आधारित भाषाशिक्षणाचा आराखडा
फडणवीस म्हणाले, “एआय एजंटशी संवाद साधत विद्यार्थ्यांचे बोलणे, उच्चार, शब्दसंपत्ती आणि अभिव्यक्ती यांचे विश्लेषण केले जाईल. प्रत्येक विद्यार्थ्याला केवळ गुणपत्रिका नव्हे, तर भाषिक प्रगतीचा तपशीलवार अहवाल मिळेल.” मराठी बोलण्याचा सराव आणि उच्चारशुद्धता यासाठी डिजिटल संवादमाध्यमांचा वापर होणार असून, शिक्षकांना अध्यापनसहाय्य साधने उपलब्ध केली जातील.
एआयच्या साहित्यनिर्मिती क्षमतेचा उल्लेख करत त्यांनी सांगितले की, “चॅटजीपीटीसारख्या साधनांतून कविता-लेखन शक्य असते; मात्र ते मशीन लर्निंगवर आधारित रचनाकौशल्य आहे. नवविचारांची स्पंदने आणि मानवी संवेदना ही सर्जनशील साहित्यकारांकडूनच येतात.”
परंपरेचा संदर्भ, भविष्याचा संकल्प
मराठीच्या ऐतिहासिक परंपरेचा उल्लेख करत मुख्यमंत्री म्हणाले की छत्रपती शिवाजी महाराज यांनी राज्यकारभारासाठी प्रमाणभाषेचा कोश घडविला, तर विनायक दामोदर सावरकर यांनी भाषाशुद्धीची चळवळ राबविली. त्या परंपरेला नवतंत्रज्ञानाची जोड देत मराठीला ज्ञान-विज्ञानाची भाषा बनविण्याचा संकल्प राज्य सरकारचा असल्याचे त्यांनी नमूद केले.
कांदा प्रश्नावर बैठक
नाशिक परिसरातील कांदा दरप्रश्न तीव्र असल्याच्या पार्श्वभूमीवर “शेतकऱ्यांशी लवकरच बैठक घेऊन तोडगा काढू,” असे आश्वासन फडणवीस यांनी दिले. “महायुती सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे,” असेही ते म्हणाले.
पुढील संमेलन विदर्भात?
चौथे संमेलन नाशिकमध्ये होत असले तरी हे जागतिक व्यासपीठ असल्याने पुढील विश्व मराठी संमेलन विदर्भात आयोजित करण्याची मागणी त्यांनी व्यक्त केली
मराठी उपजीविकेची भाषा व्हावी – सुनेत्रा पवार
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी मराठीला ज्ञान, विज्ञान आणि उपजीविकेची भाषा बनविण्याची गरज अधोरेखित केली. दिवंगत अजित पवार यांनी लंडनमधील महाराष्ट्र भवनासाठी निधी दिल्याची आठवण करून त्यांनी मराठीच्या जागतिक विस्ताराची दिशा स्पष्ट केली.
भाषा विभागाचा विस्तार – उदय सामंत
उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी सांगितले की, मराठी भाषा विभागाचा निधी ६५ कोटींवरून २६५ कोटींवर पोहोचला आहे. मुंबईतील मराठी भवनाचे काम २७ फेब्रुवारी २०२७ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट त्यांनी व्यक्त केले. यशवंतराव चव्हाण यांच्या नावाने अनुवाद समिती स्थापन करून ग्रामीण साहित्याचे इतर भाषांत रूपांतर केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
पुरस्कार वितरण
या सोहळ्यात ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांना साहित्यभूषण, श्रीनिवास कुलकर्णी यांना विंदा करंदीकर जीवनगौरव, डॉ. दिलीप धोंडगे यांना डॉ. अशोक केळकर मराठी भाषा अभ्यासक (व्यक्ती) पुरस्कार प्रदान करण्यात आला. इचलकरंजीचे आपटे वाचन मंदिर व कर्नाटक राज्य मराठी साहित्य परिषद (कलबुर्गी) यांसह विविध संस्था-व्यक्तींनाही गौरविण्यात आले.
विशेष उपक्रम व कार्यक्रम
‘आपलं मंत्रालय’ शासकीय मासिकाचे प्रकाशन
बृहन्महाराष्ट्र मंडळांची संख्या १७ वरून ७५ करण्याचा मानस
निवृत्ती महाराज समाधी संस्थानास ५० लाखांचा निधी
‘शाहीर वामनदादा कर्डक मंच’ (रावसाहेब थोरात सभागृह) नामकरण
दिवसभर विविध परिसंवादांचे आयोजन करण्यात आले. ‘कृत्रिम बुद्धिमत्तेचा मराठीतील वापर’, ‘मराठी प्रकाशनांचे बदलते प्रवाह’ आणि आंतरराष्ट्रीय मंचावरील चर्चासत्रांना अभ्यासक-साहित्यिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.


