नाशिक प्रतिनिधी
नाशिकमध्ये तथाकथित आध्यात्मिक चमत्कारांच्या नावाखाली मोठं जाळं उभं करणारा भोंदू बाबा अशोक खरात आता गंभीर अडचणीत सापडण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. महिला अत्याचाराच्या आरोपांनंतर सुरू झालेल्या तपासात आता कोट्यवधी रुपयांच्या संशयास्पद आर्थिक व्यवहारांचा धागा हाती लागल्याने प्रकरणाला नवं वळण मिळालं आहे. आर्थिक गैरव्यवहारांचा संशय गडद होत चालल्याने सक्तवसुली संचालनालय (ED) या प्रकरणात लवकरच एन्ट्री करू शकते, अशी शक्यता तपास यंत्रणांमधून व्यक्त केली जात आहे.
पोलीस तपासात समोर आलेल्या प्राथमिक माहितीनुसार, अशोक खरातशी संबंधित तब्बल १३२ बँक आणि पतसंस्थांची खाती संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहेत. या खात्यांमधून झालेल्या व्यवहारांची रक्कम कोट्यवधी रुपयांत असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे या सर्व व्यवहारांचा तपास आता अधिक सखोल पद्धतीने सुरू करण्यात आला आहे. या आर्थिक हालचालींचा मागोवा घेताना अनेक धक्कादायक बाबी पुढे येण्याची शक्यता तपास अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
पतसंस्थांतील खाती तपासाच्या कक्षेत
शिर्डी पोलिसांनी केलेल्या तपासात एक अत्यंत महत्त्वाचा धागा समोर आला आहे. अशोक खरात हा समता पतसंस्थेतील तब्बल १०० खात्यांचा नॉमिनी असल्याचे उघड झाले आहे. याशिवाय जगदंबा पतसंस्थेत आणखी ३२ खाती आढळून आली आहेत. या दोन्ही संस्थांमधील आर्थिक व्यवहारांचा तपशील तपास यंत्रणांनी मागवला असून, या खात्यांमधून झालेल्या व्यवहारांची पडताळणी सुरू आहे.
विशेष म्हणजे जगदंबा पतसंस्थेचे व्यवस्थापक अविनाश कांडेकर यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीत एक धक्कादायक बाब उघड केली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, इतर व्यक्तींची कागदपत्रे वापरून अशोक खरात स्वतः ३२ खाती चालवत होता. त्यामुळे या खात्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा संशय अधिक बळावला आहे.
समता पतसंस्थेतील १०० खात्यांमध्येही अशाच प्रकारचे व्यवहार झाले असण्याची शक्यता तपास यंत्रणा व्यक्त करत आहेत. या सर्व खात्यांमधून पैसे कुठून आले, कुठे गेले, कोणत्या व्यक्तींशी व्यवहार झाले, याची साखळी आता उलगडण्याचा प्रयत्न सुरू आहे.
एका ‘विशिष्ट तारखे’चा गूढ
तपासादरम्यान समोर आलेली आणखी एक बाब पोलिसांना चक्रावून टाकणारी ठरली आहे. अनेक पतसंस्थांमध्ये खाते उघडण्याची तारीख तपासताना एक विलक्षण नमुना आढळून आला आहे. अनेक खाती एकाच विशिष्ट तारखेला उघडण्यात आली असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
ही बाब लक्षात आल्यानंतर पोलिसांनी त्या तारखेशी संबंधित सर्व व्यवहारांचा तपशील मागवला आहे. त्या दिवशी नक्की काय घडलं होतं? त्या तारखेला इतकी खाती उघडण्यामागे कोणतं नियोजन होतं का? या सर्व प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न सुरू आहे.
यासाठी अनेक पतसंस्था आणि बँकांकडून खाते उघडण्याचे अर्ज, केवायसी कागदपत्रे आणि व्यवहारांची माहिती मागवण्यात आली आहे.
व्यवहारांच्या जाळ्यात अनेकांचे नाव येण्याची शक्यता
या आर्थिक व्यवहारांच्या तपासात केवळ अशोक खरातच नव्हे तर त्याच्याशी आर्थिक व्यवहार करणाऱ्या अनेक व्यक्तींची नावं समोर येण्याची शक्यता आहे. त्यामुळे या व्यवहारांशी संबंधित असलेल्या लोकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
तपास यंत्रणांच्या म्हणण्यानुसार, या खात्यांमधील पैशांचा स्रोत आणि त्याचे अंतिम गंतव्य शोधणे हा तपासाचा महत्त्वाचा भाग असणार आहे. पैशांचा प्रवाह शोधताना अनेक राजकीय, व्यावसायिक किंवा सामाजिक क्षेत्रातील व्यक्तींची नावं पुढे येण्याची शक्यता नाकारता येत नाही, अशी चर्चा पोलीस वर्तुळात सुरू आहे.
ईडीच्या एन्ट्रीची शक्यता
प्रकरणात कोट्यवधी रुपयांच्या संशयास्पद व्यवहारांचा मुद्दा पुढे आल्याने आता आर्थिक गुन्ह्यांचा तपास करणाऱ्या केंद्रीय यंत्रणांचे लक्ष या प्रकरणाकडे वळू शकते. विशेषतः मनी लॉन्डरिंगचा संशय निर्माण झाल्यास सक्तवसुली संचालनालय (ED) या प्रकरणात चौकशी सुरू करू शकते.
ईडीने तपास हाती घेतल्यास या सर्व व्यवहारांची आर्थिक कुंडली उघड होण्याची शक्यता आहे. त्यानंतर खरातच्या आर्थिक जाळ्यात अडकलेल्या अनेकांच्या अडचणी वाढू शकतात.
तपासाची दिशा ठरवणारे पुढील काही दिवस
सध्या शिर्डी आणि नाशिक पोलिसांकडून आर्थिक व्यवहारांची साखळी तपासली जात असून, बँका आणि पतसंस्थांकडून मिळणाऱ्या कागदपत्रांवर तपासाची पुढील दिशा ठरणार आहे.
दरम्यान, भोंदू बाबा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अशोक खरात प्रकरणाने आधीच सामाजिक आणि राजकीय पातळीवर खळबळ उडवली आहे. आता आर्थिक गैरव्यवहारांचा मुद्दा पुढे आल्याने हे प्रकरण आणखी गंभीर स्वरूप धारण करत असून, या तपासातून नेमके किती जणांच्या गळ्याला फास बसणार, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.


