नाशिक प्रतिनिधी
शहरात वाढत्या गुन्हेगारीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर सोमवारी भरदिवसा घडलेल्या एका थरारक खूनप्रकरणाने कायदा-सुव्यवस्थेच्या प्रश्नावर पुन्हा एकदा गंभीर चर्चा सुरू झाली आहे. विल्होळी परिसरात एका महिलेने तरुणावर कोयत्याने सपासप वार करून त्याची निर्घृण हत्या केल्याची घटना उघडकीस आली असून, या घटनेचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांवर व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे.
मुंबई-आग्रा महामार्गालगतच्या विल्होळी शिवारात दुपारच्या सुमारास ही घटना घडली. सूरज सोळंकी (रा. कुंभारवाडा, नाशिक) असे मृत तरुणाचे नाव असून, प्राथमिक माहितीनुसार तो त्या परिसरात काही कामानिमित्त गेला असताना हल्लेखोर महिलेशी त्याची समोरासमोर भेट झाली. यावेळी संबंधित महिलेने तोंडाला स्कार्फ बांधून अचानक धारदार कोयत्याने सूरजवर हल्ला चढवला.
घटनेच्या प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, काही क्षणांतच महिलेने सूरजच्या डोक्यावर व शरीरावर एकामागून एक वार केले. या भीषण हल्ल्यात गंभीर जखमी झालेला सूरज घटनास्थळीच रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. वैद्यकीय मदत मिळण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.
दरम्यान, ही संपूर्ण घटना त्या मार्गावरून जात असलेल्या एका वाहनधारकाने मोबाईलमध्ये कैद केली. सदर व्हिडिओ सध्या सामाजिक माध्यमांवर मोठ्या प्रमाणात प्रसारित होत असून, त्यातून घटनेची भीषणता अधोरेखित होत आहे. पोलिसांकडून या व्हिडिओची सत्यता तपासली जात आहे.
हल्ल्यानंतर संबंधित महिला दुचाकीवरून पसार झाली. विशेष म्हणजे, तिच्यासोबत आणखी एक व्यक्ती असल्याची माहिती समोर येत असून, दुचाकीची नंबर प्लेट ओळख पटू नये म्हणून कपड्याने झाकण्यात आली होती. यावरून हा हल्ला पूर्वनियोजित असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
घटनेची माहिती मिळताच नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्यासह स्थानिक पोलीस अधिकारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून, आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष पथके तयार करण्यात आली आहेत.
दरम्यान, अलीकडील काही संवेदनशील प्रकरणांनंतर पुन्हा एकदा उघडकीस आलेल्या या खूनप्रकरणामुळे नाशिकमधील कायदा व सुव्यवस्थेबाबत नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे. या घटनेमागील नेमके कारण, आरोपी आणि मृत व्यक्तीतील संबंध, तसेच हल्ल्याचा हेतू याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत.


