नाशिक प्रतिनिधी
नाशिकमध्ये उघडकीस आलेल्या भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणात विशेष तपास पथकाने (SIT) मोठी कारवाई सुरू केली असून, पीडित महिलांचे व्हिडिओ सोशल मीडियावरून हटवण्यासाठी सायबर यंत्रणा युद्धपातळीवर काम करत आहे. आतापर्यंत तब्बल 4650 आक्षेपार्ह लिंक्स हटवण्यात आल्या असून, चार अधिकाऱ्यांची स्वतंत्र टीम २४ तास सोशल मीडियावर लक्ष ठेवून असल्याची माहिती SIT प्रमुख तेजस्वी सातपुते यांनी पत्रकार परिषदेत दिली.
नाशिकचा भोंदू बाबा अशोक खरात याच्याविरोधात लैंगिक शोषण, अंधश्रद्धा पसरवणे, फसवणूक, जादूटोणा प्रतिबंधक कायद्याचे उल्लंघन अशा विविध स्वरूपाचे एकूण 11 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणातील काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यामुळे पीडित महिलांची बदनामी होण्याची शक्यता निर्माण झाली होती. त्यामुळे SIT ने सायबर स्तरावर विशेष मोहीम सुरू केली आहे.
श्रद्धेचा गैरफायदा घेऊन महिलांचे शोषण
पत्रकार परिषदेत बोलताना तेजस्वी सातपुते म्हणाल्या की, तपासादरम्यान धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. आरोपी अशोक खरात हा महिलांच्या श्रद्धेचा आणि भीतीचा गैरफायदा घेत होता.
तो पीडितांना दैवी शक्ती असल्याचे सांगून त्यांना आपल्या प्रभावाखाली ठेवत असे. कुटुंबीयांच्या मृत्यूची भीती दाखवणे, बदनामीची धमकी देणे आणि अंधश्रद्धेचा आधार घेत लैंगिक शोषण केल्याचे तपासातून समोर आले आहे.
तसेच खडे, चिंचोके, पूजा-पाठ आणि तथाकथित उपाययोजना यांच्या नावाखाली पैसे उकळले जात होते. नाशिकमधील ईशान्यश्वर मंदिर परिसरात अंधारात दैवी शक्ती असल्याचा आभास निर्माण करून अंधश्रद्धा पसरवली जात असल्याचेही तपासात उघड झाले आहे.
पीडितांच्या गोपनीयतेचे संरक्षण महत्त्वाचे
या प्रकरणातील अनेक महिलांनी ‘लोक काय म्हणतील’ या भीतीमुळे बराच काळ अन्याय सहन केला, असेही सातपुते यांनी सांगितले. अखेर त्यांनी धाडस करून पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे.
त्यामुळे नागरिकांनी पीडितांची ओळख उघड करू नये, त्यांचे व्हिडिओ शेअर करू नयेत आणि मोबाईलमध्ये साठवू नयेत, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणांमध्ये पीडितेची ओळख जाहीर करणे हा कायद्याने गुन्हा असून त्यासाठी शिक्षा होऊ शकते, असेही पोलिसांनी स्पष्ट केले.
4650 लिंक्स हटवण्याची कारवाई
SIT च्या सायबर पथकाने आतापर्यंत सोशल मीडियावरील 4650 लिंक्स हटवल्या आहेत.
चार अधिकाऱ्यांची विशेष टीम २४ तास सोशल मीडिया मॉनिटरिंग करत आहे. काही मिनिटांत नवीन व्हिडिओ किंवा पोस्ट अपलोड झाली का, याचा शोध घेऊन त्याला तात्काळ रिपोर्ट करून हटवण्याची प्रक्रिया सुरू आहे.
तसेच आक्षेपार्ह पोस्ट वारंवार टाकणाऱ्या काही सोशल मीडिया ग्रुप्स बंद करण्यात आले आहेत.
व्हिडिओ व्हायरल करणाऱ्यांवरही कारवाई
या प्रकरणातील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केल्याप्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आली आहे. तर अहिल्यानगर पोलिसांनी आणखी सहा जणांना अटक केली आहे.
सायबर गुन्ह्यांवर कठोर कारवाई सुरू असून, पीडितांच्या गोपनीयतेचा भंग करणाऱ्यांवर कठोर कायदेशीर पावले उचलली जातील, असा इशाराही SIT ने दिला आहे.
तपासाचा वेग वाढला
दरम्यान, अशोक खरात प्रकरणामुळे राज्यभर खळबळ उडाली असून, तपासाचा वेग वाढवण्यात आला आहे. पीडित महिलांचे जबाब नोंदवणे, आर्थिक व्यवहारांची चौकशी आणि अंधश्रद्धेच्या नावाखाली चालणाऱ्या कारवायांचा तपास यावर SIT विशेष लक्ष केंद्रित करत आहे.
या प्रकरणात आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता तपास यंत्रणांनी व्यक्त केली आहे.


