नाशिक प्रतिनिधी
नाशिकमध्ये स्वतःला ‘कॉस्मोलॉजी तज्ज्ञ’ आणि ज्योतिषी म्हणून प्रसिद्धी मिळवणाऱ्या कॅप्टन अशोक खरात याला बलात्काराच्या आरोपावरून पोलिसांनी अटक केली असून या प्रकरणामुळे मोठी खळबळ उडाली आहे. राजकीय नेते, उद्योजक आणि सेलिब्रिटींना भविष्य सांगणारा ज्योतिषी म्हणून ओळख असलेल्या खरातच्या अटकेनंतर अनेक धक्कादायक बाबी समोर येत आहेत. या प्रकरणात राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांचं नाव चर्चेत आल्याने राजकीय वर्तुळातही खळबळ उडाली आहे.
रूपाली चाकणकरांच्या छत्रछायेखाली…..
कॅप्टन अशोक खरात नावाच्या स्वयंघोषित ज्योतिषाला आज नाशिक पोलिसांनी अटक केली खरात याच्यावर बलात्कार योन शोषण यासारखे आरोप आहेत.
पोलिसांनी हस्तगत केलेल्या पेन ड्राईव्ह मधून 58 आक्षेपार्ह व्हिडिओ पोलिसांनी हस्तगत केल्याची माहिती… pic.twitter.com/kQNGznfsos— SushmaTai Andhare (@andharesushama) March 18, 2026
महिलेच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल
नाशिकमधील ३५ वर्षीय महिलेने दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी अशोक खरातविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला. त्यानंतर नाशिक गुन्हे शाखेने कॅनडा कॉर्नर परिसरातील त्याच्या कार्यालयावर छापा टाकला. या कारवाईदरम्यान पोलिसांच्या हाती काही आक्षेपार्ह पुरावे लागल्याची माहिती समोर आली आहे. कार्यालयात मिळालेल्या पुराव्यांमुळे तपास अधिक गंभीर स्वरूपाचा बनला असून पोलिसांनी त्याचा मोबाईल आणि इतर साहित्य जप्त केले आहे.
अनेक प्रभावशाली लोकांशी संपर्क
अशोक खरात हा नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील मिरगाव येथील श्री ईशान्येश्वर मंदिर ट्रस्टचा अध्यक्ष आहे. तो ‘कॅप्टन’ म्हणून ओळखला जात असून मर्चंट नेव्हीमधील सेवानिवृत्त अधिकारी असल्याची माहिती समोर आली आहे. ‘शिवनिका ट्रस्ट’च्या संकेतस्थळावर दिलेल्या माहितीनुसार, मर्चंट नेव्हीमधील २२ वर्षांच्या सेवेत त्याने १५४ देशांचा प्रवास केला होता. त्या देशांमधील धार्मिक परंपरा, संस्कृती आणि अध्यात्माचा अभ्यास केल्याचा दावा त्याच्याकडून केला जात होता.
नोव्हेंबर २०२२ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मिरगाव येथील मंदिराला भेट दिल्यानंतर अशोक खरात अचानक चर्चेत आला होता. त्यानंतर अनेक राजकीय नेते, उद्योगपती आणि सेलिब्रिटी त्याच्याकडे सल्ला घेण्यासाठी जात असल्याची चर्चा होती.
रूपाली चाकणकर कनेक्शनवरून वाद
दरम्यान, अटक झालेला अशोक खरात हा राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाणक्य यांचा गुरू असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी या प्रकरणावरून गंभीर सवाल उपस्थित केला आहे.
अंधारे यांनी म्हटलं की, महिलांचे शोषण करणारा असा व्यक्ती जर महिला आयोगाच्या अध्यक्षांचा गुरू असेल, तर महिलांच्या सुरक्षेची जबाबदारी त्या कशा पेलणार? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. तसेच, चाकणकर या खरातने स्थापन केलेल्या संस्थेच्या सदस्य असल्याचाही आरोप त्यांनी केला.
मोबाईलमधून अश्लील व्हिडीओ जप्त
पोलिस तपासादरम्यान खरातच्या मोबाईलमधून ५० हून अधिक महिलांचे अश्लील व्हिडीओ सापडल्याची माहिती समोर येत आहे. या व्हिडीओंच्या आधारे आणखी महिलांचे शोषण झाले का, याचा तपास सध्या पोलिसांकडून केला जात आहे. त्यामुळे या प्रकरणाचा तपास अधिक व्यापक होण्याची शक्यता आहे.
कॉस्मोलॉजीत सुवर्णपदकाचा दावा
अशोक खरातने गुरू मुजुमदार यांच्या मार्गदर्शनाखाली कॉस्मोलॉजी या विषयात शिक्षण घेतल्याचा दावा केला होता. प्रशिक्षणादरम्यान त्याला सुवर्णपदक मिळाल्याचीही माहिती सांगितली जात होती. मर्चंट नेव्हीमधून निवृत्तीनंतर त्याने कॉस्मोलॉजी आणि अंकशास्त्राच्या नावाखाली मार्गदर्शन देण्यास सुरुवात केली होती.
दरम्यान, पोलिसांनी खरातला अटक करून पुढील तपास सुरू केला असून या प्रकरणात आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.


