मुंबई प्रतिनिधी
पोलीस होण्याचे स्वप्न उराशी बाळगून ग्रामीण भागातून मुंबईत आलेल्या तरुणाला तिकीट तपासणीदरम्यान रेल्वे कर्मचाऱ्याने चालत्या लोकलमधून उतरवण्याचा प्रयत्न केल्याने तो पडून जखमी झाल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. या घटनेमुळे शनिवारी होणाऱ्या पोलीस भरतीच्या मैदानी परीक्षेपूर्वीच संबंधित उमेदवाराच्या स्वप्नांवर संकट ओढावले आहे. मध्य रेल्वेने घटनेची चौकशी करण्याचे आश्वासन दिले आहे.
पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील सुयेश अंकुश तांबे (२१) हा तरुण पोलीस भरतीची तयारी करण्यासाठी काही वर्षांपासून सातत्याने सराव करत होता. शनिवारी होणाऱ्या मैदानी चाचणीसाठी तो मित्रांसह मुंबईत आला. दादरहून लोकलने ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) येथे पोहोचले.
स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक ५-६ परिसरात तिकीट तपासणीदरम्यान संबंधित तरुणांकडे वैध तिकीट नसल्याचे आढळले. त्यांना दंड भरण्यास सांगितल्यानंतर टाळाटाळ होत असल्याने तिकीट तपासनीसांनी त्यांना प्लॅटफॉर्म क्रमांक १ वरील कार्यालयात नेण्यास सुरुवात केली.
प्लॅटफॉर्मऐवजी लोकलमधून नेण्याचा आरोप
कार्यालयात नेण्यासाठी प्लॅटफॉर्मवरून चालत जाण्याऐवजी प्लॅटफॉर्म क्रमांक ४ वर उभ्या असलेल्या लोकलमधून दुसऱ्या बाजूस नेण्याचा ‘शॉर्टकट’ संबंधित कर्मचाऱ्याने निवडल्याचा आरोप आहे. दरम्यान अचानक लोकल सुरू झाल्याने तरुणांमध्ये घबराट पसरली. घाईगडबडीत उतरविताना सुयेशचा तोल जाऊन तो प्लॅटफॉर्मवर जोरात आपटला.
या अपघातात त्याच्या पायाला गंभीर दुखापत झाली असून त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. “कित्येक वर्षांची तयारी एका क्षणात वाया जाते की काय, अशी भीती वाटते,” अशी खंत सुयेशने व्यक्त केली.
प्रवाशांचा संताप; चौकशीची घोषणा
घटनेनंतर स्थानक परिसरात उपस्थित प्रवाशांनी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या वर्तणुकीवर तीव्र नाराजी व्यक्त केली. विना तिकीट प्रवास ही तरुणांची चूक असली तरी चालत्या गाडीतून उतरविणे किंवा प्रवाशांना धोकादायक पद्धतीने नेणे अमान्य असल्याचे त्यांनी नमूद केले.
मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्नील नीला यांनी “सीएसएमटी स्थानकातील घटनेची सखोल चौकशी करण्यात येईल. निष्काळजीपणा आढळल्यास संबंधित कर्मचाऱ्यावर कारवाई केली जाईल,” असे सांगितले. तसेच पोलीस भरतीसाठी मुंबईत येणाऱ्या उमेदवारांनी वैध तिकीट घेऊनच लोकल प्रवास करावा, असे आवाहनही करण्यात आले आहे.
या घटनेमुळे रेल्वे प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून भरतीसाठी येणाऱ्या उमेदवारांच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.


