पुणे प्रतिनिधी
राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूच्या प्रकरणाचा तपास वेगाने सुरू असून गुन्हे अन्वेषण विभागाच्या (CID) हाती काही महत्त्वाचे पुरावे लागल्याची माहिती राज्याचे अप्पर पोलीस महासंचालक सुनील रामानंद यांनी दिली. अपघातामागे घातपात किंवा गुन्हेगारी कट होता का, या मुख्य मुद्द्यावर तपास केंद्रीत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
पुण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत रामानंद म्हणाले की, “गेल्या २८ दिवसांपासून तपास अत्यंत व्यावसायिक पद्धतीने सुरू आहे. विविध तांत्रिक आणि परिस्थितीजन्य बाबींची तपासणी केली जात असून काही महत्त्वाचे धागेदोरे आमच्या हाती लागले आहेत.”
या प्रकरणात विमान अपघाताच्या तांत्रिक तपासासाठी यांच्याशी सातत्याने समन्वय ठेवण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. AAIBचा अंतिम अहवाल प्राप्त झाल्यानंतर तो CIDच्या गुन्हे अन्वेषण प्रक्रियेत समाविष्ट केला जाईल, असेही त्यांनी नमूद केले.
दरम्यान, अपघातामागे घातपात, षडयंत्र किंवा अन्य गुन्हेगारी बाबी असल्याचे निष्पन्न झाल्यास संबंधित कलमांनुसार गुन्हा नोंदवून पुढील तपास करून न्यायालयात अभियोग दाखल करण्यात येईल, असे रामानंद यांनी स्पष्ट केले.
राज्य सरकारने या प्रकरणाचा तपास केंद्रीय संस्थेकडे सोपविण्याबाबत केंद्राशी पत्रव्यवहार केला असून विमान कंपनीसंदर्भातील नागरी उड्डाण महासंचालनालयाच्या (DGCA) अहवालाची प्रतीक्षा असल्याचेही त्यांनी सांगितले.
तपासात आतापर्यंत लक्षणीय प्रगती झाली असून उपलब्ध पुरावे आणि तांत्रिक अहवालांच्या आधारे अपघाताचे नेमके कारण निश्चित करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे CIDकडून सांगण्यात आले.


