मुंबई प्रतिनिधी
मुंबई महापालिकाचा सन २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठीचा अंदाजे ८० हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक आकारमानाचा अर्थसंकल्प बुधवारी सादर होणार असून, प्रशासकीय राज संपल्यानंतर प्रथमच स्थायी समितीसमोर तो मांडला जाणार आहे. महापालिका आयुक्त भूषण गगराणी दुपारी २ वाजता स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांना अर्थसंकल्प सादर करतील.
तत्पूर्वी सकाळी ११ वाजता शिक्षण खात्याचा स्वतंत्र अर्थसंकल्प शिक्षण समितीच्या बैठकीत शिक्षण समिती अध्यक्षा राजेश्री शिरवडकर यांच्यासमोर अतिरिक्त आयुक्त अविनाश ढाकणे मांडतील.
देशाच्या आर्थिक राजधानीचा कारभार पाहणाऱ्या महापालिकेचा अर्थसंकल्प गेल्या काही वर्षांत सातत्याने वाढत असून २०२१-२२ मधील ३५,९६२ कोटी रुपयांवरून २०२५-२६ मध्ये ७४,४२७ कोटी रुपयांपर्यंत पोहोचला आहे. यंदा तो ८० हजार कोटींचा टप्पा ओलांडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तथापि नव्या योजनांपेक्षा आर्थिक शिस्त व प्रकल्पनिहाय निधी व्यवस्थापनावर भर राहण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली.
मुदत ठेवी घटण्याची चिन्हे
महापालिकेच्या विविध बँकांतील मुदत ठेवी काही वर्षांपूर्वी सुमारे ९२ हजार कोटी रुपयांवर होत्या. प्रशासकीय कालावधीत विकासकामांसाठी त्यात मोड झाल्याने त्या सध्या अंदाजे ८१ हजार कोटी रुपयांवर आल्या आहेत. पुढील काळात मोठ्या प्रकल्पांसाठी निधी वापर वाढल्यास हा आकडा सुमारे ७७ हजार कोटी रुपयांपर्यंत खाली येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
भांडवली खर्चात वाढ
भांडवली खर्चाचा वाटा महापालिकेच्या अर्थसंकल्पात सातत्याने वाढत आहे. २०२१-२२ मध्ये १२,५३५ कोटी रुपयांवर असलेला हा खर्च २०२४-२५ मध्ये २७,९५५ कोटी रुपयांपर्यंत गेला. चालू वर्षात जानेवारीअखेर १९,४४३ कोटी रुपये खर्च झाले आहेत. पायाभूत सुविधा, रस्ते, जलनिस्सारण व आरोग्य सुविधा यांसारख्या प्रकल्पांवर भर कायम राहण्याची चिन्हे आहेत.
करदरात मोठी वाढ टळण्याची शक्यता
अलीकडील महापालिका निवडणुकीनंतर सत्तांतर झाले असले तरी नव्याने थेट कर किंवा मोठी दरवाढ करण्याची शक्यता कमी मानली जाते. पाणी दरातील वार्षिक ८ टक्के वाढ यंदा स्थगित ठेवण्याचा विचार सुरू असल्याचे संकेत आहेत. मात्र विविध शुल्क, सेवा आकार किंवा नियामक दरांद्वारे अप्रत्यक्ष महसूलवाढीचे प्रस्ताव अर्थसंकल्पात येण्याची शक्यता नाकारता येत नाही.
एकूणच, ८० हजार कोटींच्या पुढे जाणाऱ्या आकारमानासह आर्थिक व्यवस्थापन व भांडवली गुंतवणुकीवर भर देणारा महापालिकेचा अर्थसंकल्प आज समोर येणार आहे.


