नागपूर प्रतिनिधी
बारावीच्या विज्ञान शाखेच्या भौतिकशास्त्र व रसायनशास्त्र विषयांची प्रश्नपत्रे परीक्षेच्या तासाभरापूर्वीच व्हॉट्सअॅपवर प्रसारित झाल्याचा गंभीर प्रकार नागपूरमध्ये उघडकीस आला आहे. या प्रकरणी सदर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून खासगी शिकवणी वर्गाशी संबंधित शिक्षकाने पैशांच्या मोबदल्यात प्रश्नपत्र फुटविल्याची शक्यता तपासात समोर आली आहे. परीक्षा व्यवस्थेवरील विश्वासाला तडा देणाऱ्या या घटनेमुळे शिक्षण विभागात खळबळ उडाली आहे.
गुरुवारी घेण्यात येणाऱ्या रसायनशास्त्राच्या पेपरपूर्वीच प्रश्नपत्र काही विद्यार्थ्यांच्या मोबाईलवर उपलब्ध असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार सदर परिसरातील सेंट उर्सुला परीक्षा केंद्रावर देखरेख वाढविण्यात आली. केंद्रातील निरीक्षकांच्या लक्षात आले की, एक विद्यार्थिनी वारंवार प्रसाधनगृहात जात आहे. संशय आल्याने तिची शिक्षिकेमार्फत तपासणी करण्यात आली असता तिच्याकडून स्मार्टफोन जप्त करण्यात आला.
मोबाईलची पाहणी केली असता परीक्षेला सुरुवात होण्यापूर्वीच एका व्हॉट्सअॅप गटावर संबंधित प्रश्नपत्र पाठविण्यात आल्याचे आढळून आले. केंद्रप्रमुखांनी तत्काळ सदर पोलिसांना माहिती दिल्यानंतर गुन्हा नोंदवून तपास सुरू करण्यात आला.
तपासादरम्यान १५ विद्यार्थ्यांचा बंद व्हॉट्सअॅप गट तयार करून प्रश्नपत्र प्रसारित करण्यात आल्याचे स्पष्ट झाले. चौकशीत सहभागी दोन विद्यार्थिनींनी खासगी शिकवणी वर्गातील एका शिक्षकाने पैशांच्या मोबदल्यात प्रश्नपत्र उपलब्ध करून दिल्याचे सांगितले. या गटातील उर्वरित १३ विद्यार्थी शहरातील विविध परीक्षा केंद्रांवर परीक्षेला बसले होते, अशी माहिती पोलिसांनी दिली.
पोलिसांकडून जप्त मोबाईलचे तांत्रिक विश्लेषण, गटातील संदेशांची साखळी व आर्थिक व्यवहारांचा तपास सुरू असून प्रश्नपत्र गळतीचे मूळ स्रोत शोधण्याचे प्रयत्न सुरू आहेत. संबंधित शिक्षक, विद्यार्थ्यांचे पालक तसेच परीक्षा प्रक्रियेशी संबंधित कर्मचाऱ्यांची चौकशी होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, प्रश्नपत्र फुटीच्या या प्रकारामुळे परीक्षा व्यवस्थेच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून शिक्षण मंडळाने घटनेची स्वतंत्र चौकशी सुरू करण्याची तयारी दर्शविली आहे. दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी पालक व शैक्षणिक वर्तुळातून होत आहे.


