नागपूर प्रतिनिधी
द्रौपदी मुर्मू यांच्या विदर्भ दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर नागपूर शहरातील वाहतूक व्यवस्थेत तात्पुरते बदल करण्याचा निर्णय पोलिस प्रशासनाने घेतला आहे. जामठा येथील विश्वशांती सरोवर येथे बुधवारी (ता. २५) होणाऱ्या कार्यक्रमादरम्यान वर्धा रोड व परिसरात मोठ्या प्रमाणावर गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेऊन जड वाहतुकीला पर्यायी मार्ग देण्यात येणार आहेत. ही अधिसूचना २५ ते २६ फेब्रुवारीदरम्यान लागू राहणार आहे.
वाहतूक विभागाचे पोलिस उपायुक्त लोहित मतानी यांनी मोटार वाहन अधिनियम १९८८ मधील कलम ११५, ११६ व ११७ अन्वये आदेश जारी केला आहे. कार्यक्रमस्थळाकडे येणारी वर्धा–नागपूर तसेच नागपूर–वर्धा मार्गावरील जड वाहतूक नियंत्रित करण्यासाठी विविध ठिकाणी वळविण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
जड वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग
वर्धा रोडवरील डोंगरगाव टोलनाक्याकडून नागपूर, जबलपूर, भंडाराकडे जाणारी जड वाहतूक डोंगरगाव टोलवरून वळवून गुमगावमार्गे समृद्धी झिरो सर्कलकडे पाठविण्यात येईल.
वर्धा मार्गावरून बुटीबोरीमार्गे जाणारी जड वाहतूक दाताळा गावमार्गे समृद्धी झिरो सर्कलकडे वळवली जाईल.
समृद्धी महामार्गावरून अमरावतीकडून नागपूरकडे येणारी वाहतूक समृद्धी झिरो सर्कल–वृंदावन कटिंग येथे थांबविण्यात येईल.
पांजरा टोल नाक्याकडून येणारी वाहतूक पांगरी टोल नाका येथे थांबविण्यात येईल; समृद्धी महामार्गाकडे जाणाऱ्यांना आवश्यकतेनुसार सोडण्यात येईल.
पांजरा टोल नाक्याकडून वर्धाकडे जाणारी वाहतूक समृद्धी झिरो सर्कल–दाताळा–बुटीबोरीमार्गे वळविण्यात येईल.
नागपूरकडून वर्धाकडे जाणारी जड वाहतूक परिस्थितीनुसार नियुक्त ठिकाणी थांबविणे अथवा वळविण्यात येईल.
संत गजानन महाराज मंदिरात दर्शन
राष्ट्रपती मुर्मू यांचा विदर्भ दौरा बहुप्रतीक्षित असून विविध कार्यक्रमांबरोबरच त्या संत गजानन महाराज मंदिर येथेही दर्शनासाठी जाणार आहेत. या भेटीदरम्यान काही काळ मंदिर परिसरातील सार्वजनिक दर्शन व्यवस्था बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.
पोलिसांनी नागरिकांना सहकार्याचे आवाहन केले असून वर्धा रोड, जामठा, बुटीबोरी व समृद्धी महामार्ग परिसरात प्रवास करणाऱ्यांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.


