नागपूर : प्रतिनिधी
राज्य शासनाने ‘महाराष्ट्र बाईक टॅक्सी नियम २०२५’ लागू केल्यानंतरही नागपूर शहरात ॲपआधारित बाईक टॅक्सी सेवा विनापरवाना सुरू असल्याचे समोर आले आहे. ‘रॅपिडो’ आणि ‘उबेर’ या कंपन्यांमार्फत दुचाकी प्रवासी सेवा दिली जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर प्रादेशिक परिवहन विभागाने दोन दिवस विशेष मोहीम राबवून २० दुचाकी जप्त केल्या. संबंधित वाहनांची नोंदणी तीन महिन्यांसाठी निलंबित करण्यात आली असून प्रत्येकी दहा हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे.
गृह विभागाने २० मे २०२५ रोजी बाईक टॅक्सी सेवेसंदर्भात धोरण जाहीर केले. त्यानंतर ४ जुलै २०२५ पासून नियमांची अधिकृत अंमलबजावणी सुरू झाली. या नियमांनुसार मोबाईल ॲपच्या माध्यमातून दुचाकी अथवा चारचाकी प्रवासी सेवा देणाऱ्या कंपन्यांना परिवहन विभागाकडून ऑपरेटर परवाना घेणे बंधनकारक आहे. वाहनांची व्यावसायिक नोंदणी, चालकांचे वैध परवाने, विमा संरक्षण आणि इतर आवश्यक कागदपत्रे अद्ययावत ठेवणे अनिवार्य करण्यात आले आहे.
तथापि, नागपुरात खाजगी नोंदणी असलेल्या दुचाकींचा व्यावसायिक वापर होत असल्याचे निदर्शनास आले. या पार्श्वभूमीवर ९ आणि १० फेब्रुवारी रोजी शहरातील विविध भागांत तपासणी मोहीम राबविण्यात आली. प्रादेशिक परिवहन अधिकारी किरण बिडकर आणि उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अविनाश राऊत यांच्या नेतृत्वाखालील पथकाने पहिल्या दिवशी ११ तर दुसऱ्या दिवशी ९ अशा एकूण २० दुचाकी पकडल्या.
मोटार वाहन कायद्यान्वये खाजगी वाहनांचा विनापरवाना व्यावसायिक वापर केल्याबद्दल प्रत्येकी दहा हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. तसेच अतिरिक्त तडजोड शुल्क आकारण्यात आले असून सर्व वाहनांची नोंदणी तीन महिन्यांसाठी निलंबित करण्यात आली आहे.
आरटीओ अधिकाऱ्यांनी सांगितले की, नियमबाह्य पद्धतीने सुरू असलेल्या बाईक टॅक्सी सेवा प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने धोकादायक ठरू शकतात. अपघाताच्या प्रसंगी विमा संरक्षण, जबाबदारी आणि कायदेशीर प्रक्रियेबाबत अनिश्चितता निर्माण होण्याची शक्यता असते. त्यामुळे नागरिकांनी अशा सेवांचा वापर टाळावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
शहरात ॲपआधारित प्रवासी सेवांची वाढती मागणी लक्षात घेता सुरक्षित व नियमबद्ध सेवा उपलब्ध होणे आवश्यक आहे. संबंधित कंपन्यांनी शासनाच्या अटींचे पालन करावे, अन्यथा पुढील काळातही अशाच प्रकारची कठोर कारवाई सुरू राहील, असा इशारा परिवहन विभागाने दिला आहे.


