मुंबई प्रतिनिधी
बृहन्मुंबई महानगरपालिकाच्या स्थायी, शिक्षण, सुधार आणि ‘बेस्ट’ या वैधानिक समित्यांच्या अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया बुधवारी पूर्ण झाली. चारही समित्यांसाठी प्रत्येकी एकच अर्ज दाखल झाल्याने अध्यक्षपदांच्या निवडीचा मार्ग जवळपास मोकळा झाला आहे. संबंधित निवडणुका २० व २३ फेब्रुवारी रोजी विशेष सभांमधून पार पडणार आहेत.
स्थायी समिती अध्यक्षपदासाठी प्रभाकर शिंदे, शिक्षण समिती अध्यक्षपदासाठी राजेश्री शिरवडकर, सुधार समिती अध्यक्षपदासाठी संध्या दोशी (सक्रे) यांनी महानगरपालिका सचिव मंजिरी देशपांडे यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल केला. तर बृहन्मुंबई विद्युत पुरवठा व परिवहन उपक्रम (बेस्ट) समिती अध्यक्षपदासाठी तृष्णा विश्वासराव यांनी ‘बेस्ट’चे सहसचिव सुशील पवार यांच्याकडे अर्ज सादर केला. यावेळी सभागृह नेते गणेश खणकर तसेच नगरसेवक-नगरसेविका मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर १६ फेब्रुवारी रोजी झालेल्या विशेष सभेत स्थायी व सुधार समित्यांवर प्रत्येकी २६ सदस्य, शिक्षण समितीवर २२ महानगरपालिका सदस्य व ४ बिगर महानगरपालिका सदस्य तसेच ‘बेस्ट’ समितीवर १६ सदस्यांची नियुक्ती नामनिर्देशनाने करण्यात आली होती. त्यानंतर चारही समित्यांच्या अध्यक्षपदांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला.
उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत बुधवारी सायंकाळी सहा वाजेपर्यंत होती. प्रत्येक समितीसाठी एकच अर्ज प्राप्त झाल्याने निवडणुका औपचारिकतेपुरत्याच राहण्याची शक्यता व्यक्त होत आहे. कार्यक्रमानुसार २० फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता शिक्षण समिती अध्यक्षपदाची आणि दुपारी २ वाजता स्थायी समिती अध्यक्षपदाची निवडणूक होईल. तर २३ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता सुधार समिती अध्यक्षपदाची आणि दुपारी २ वाजता ‘बेस्ट’ समिती अध्यक्षपदाची निवडणूक घेण्यात येणार आहे.


