मुंबई प्रतिनिधी
विक्रोळीतील कन्नमवार नगर परिसरातील नाला बाधित करणाऱ्या अतिक्रमणांविरोधात बृहन्मुंबई महानगरपालिकेने मंगळवारी व्यापक कारवाई केली. नाल्यालगत अंशतः बाधित ठरलेल्या ४३ बांधकामांपैकी ३९ बांधकामांचे निष्कासन ‘एस’ विभागाने केले. या कारवाईमुळे नाल्याच्या संरक्षणभिंतीच्या उभारणीसाठी सुमारे २४० चौरस मीटर परिसर मोकळा झाला आहे.
उपआयुक्त (परिमंडळ-६) संतोषकुमार धोंडे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सहायक आयुक्त (एस विभाग) सय्यद समरिन यांच्या नेतृत्वात ही कारवाई पार पडली. पर्जन्य जलवाहिनी विभागाच्या वतीने कन्नमवार नगर नाल्याभोवती संरक्षणभिंत उभारण्याचा प्रकल्प प्रस्तावित आहे. या कामासाठी नाल्यालगतची अतिक्रमणे अंशतः बाधक ठरत असल्याने त्यांचे टप्प्याटप्प्याने निष्कासन सुरू करण्यात आले आहे.
महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, एकूण ४३ बांधकामे प्रकल्पामुळे अंशतः बाधित होत होती. त्यापैकी ३९ बांधकामांवर मंगळवारी कारवाई करण्यात आली असून उर्वरित चार बांधकामांचे निष्कासन लवकरच पूर्ण करण्यात येणार आहे.
नाल्याभोवती संरक्षणभिंत उभारल्यास पावसाळ्यातील पाण्याचा वेग नियंत्रित राहून पूरस्थितीचा धोका कमी होईल, तसेच परिसरातील नागरिकांच्या सुरक्षेत भर पडेल, असा महापालिकेचा दावा आहे.


