मुंबई प्रतिनिधी
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बुधवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ठाण्यातील ‘नंदनवन’ निवासस्थानी भेट घेतली. नुकत्याच पार पडलेल्या महानगरपालिका व जिल्हा परिषद निवडणुकांनंतर दोन्ही नेत्यांमध्ये झालेली ही पहिलीच प्रत्यक्ष भेट असल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, स्थानिक स्वराज्य संस्थांमधील सत्तासमीकरणे, विशेषतः कल्याण-डोंबिवली महापालिकेतील मनसेच्या नगरसेवकांनी शिवसेनेला दिलेला पाठिंबा, तसेच सभागृहातील सहकार्य यांसंबंधी या भेटीत चर्चा झाली. महापालिका कामकाजात मनसेचे सहकार्य राहील, असे आश्वासन ठाकरे यांनी दिल्याची माहिती मिळते. त्याबद्दल उपमुख्यमंत्री शिंदे यांनी कृतज्ञता व्यक्त केल्याचेही सांगितले जाते.
महानगरपालिका निवडणुकांनंतर मनसे-शिवसेना (शिंदे गट) संबंधांमध्ये संवाद वाढण्याची चिन्हे या भेटीतून दिसत असल्याची राजकीय निरीक्षकांची प्रतिक्रिया आहे. आगामी काळात विविध महापालिकांतील सत्तासंतुलनाच्या पार्श्वभूमीवर या संवादाचे राजकीय परिणाम काय होतात, याकडे लक्ष लागले आहे.
‘भेटीत आक्षेपार्ह काही नाही’ : सुषमा अंधारे
या भेटीवर शिवसेना (ठाकरे गट) नेत्या सुषमा अंधारे यांनी संयत प्रतिक्रिया दिली. “शिंदे हे आमचे राजकीय विरोधक असले तरी राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत. ठाकरे हे एका पक्षाचे प्रमुख आहेत. त्यामुळे त्यांनी कोणाला भेटावे, न भेटावे, यावर आम्ही भाष्य करणार नाही. एका पक्षप्रमुखाने उपमुख्यमंत्र्यांची भेट घेण्यात आक्षेपार्ह काही नाही; त्यामागे काही कारणे असू शकतात,” असे त्या म्हणाल्या.
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील सत्तासमीकरणे आणि पुढील राजकीय घडामोडींच्या संदर्भात ठाकरे-शिंदे भेटीचे महत्त्व वाढले असून, त्याचे दूरगामी परिणाम काय होतात, याची उत्सुकता राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे.


