कोल्हापूर. प्रतिनिधी
पतीने केलेल्या बेदम मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना कोल्हापूर शहरात घडली. स्वाती गणेश हुबाळे (४०, रा. सोन्यामारुती चौक, शनिवार पेठ) असे मृत महिलेचे नाव असून, या प्रकरणी पती गणेश हुबाळे याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. संशयितास तातडीने अटक न झाल्यास मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका नातेवाईकांनी घेतल्याने लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
पोलिस व नातेवाईकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, स्वाती व गणेश हुबाळे यांचा २०१२ मध्ये प्रेमविवाह झाला होता. गणेशचा सोन्यामारुती चौक परिसरात कोल्हापुरी फेट्याचा व्यवसाय असून दांपत्याला एक मुलगा व एक मुलगी आहे. गेल्या काही महिन्यांपासून पती-पत्नीमध्ये वारंवार वाद होत असल्याची माहिती स्वाती यांनी माहेरी दिली होती. पतीचे विवाहबाह्य संबंध असल्याचा संशय तसेच दागिने व ग्रामीण भागातील मालमत्ता विक्रीबाबतही तक्रारी त्यांनी भावाला केल्या होत्या.
७ फेब्रुवारी रोजी गणेशने स्वातीला बेदम मारहाण केल्याचा आरोप तिच्या भावाने केला आहे. त्यानंतर स्वाती बेपत्ता असल्याची तक्रार देण्यासाठी कुटुंबीय लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात गेले असता २४ तास प्रतीक्षा करण्यास सांगितल्याचा आरोप त्यांनी केला. काही वेळाने स्वातीला कदमवाडी येथील डी. वाय. पाटील रुग्णालयात दाखल केल्याची माहिती मिळाली. तेथे भेट दिल्यावर ती बोलण्यास असमर्थ असून ‘मला मारहाण’ असे तुटक शब्दांत सांगत असल्याचे नातेवाईकांनी सांगितले.
उपचारादरम्यान रविवारी दुपारी तिचा मृत्यू झाला. त्यानंतर पतीला अटक होईपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका नातेवाईकांनी घेतली. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक सुशांत चव्हाण यांनी पतीवर खुनाचा गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात येईल, असे आश्वासन दिल्यानंतर कुटुंबीयांनी मृतदेह स्वीकारण्यास तयारी दर्शविली. याबाबतची फिर्याद मृत महिलेची आई जयश्री यांनी दिली आहे.
दरम्यान, प्रकरणामुळे लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात मोठी गर्दी झाली होती. संशयित गणेश हुबाळे कोल्हापूरातच असल्याचा नातेवाईकांचा आरोप असून तो फरार असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
पती बेपत्ता असल्याची पूर्वी नोंद
संशयित गणेश हुबाळे १९ डिसेंबरपासून बेपत्ता असल्याची नोंद २३ डिसेंबर रोजी लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात करण्यात आली होती. लोणावळा येथे कामानिमित्त गेल्यानंतर तो परतला नसल्याची तक्रार स्वाती यांनीच केली होती, अशी माहिती पोलिसांनी दिली.
“पत्नीला मारहाण केल्यामुळे तिचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे पती गणेश हुबाळे याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात येणार आहे,” असे निरीक्षक सुशांत चव्हाण यांनी सांगितले.


