मुंबई प्रतिनिधी
तेजस ठाकरे यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना मुंबईतील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून गेल्या तीन दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांच्या तब्येतीत सुधारणा होत असल्याची माहिती कुटुंबीयांकडून मिळाली.
माहितीनुसार, बुधवारी प्रकृती खालावल्यानंतर त्यांना गिरगाव येथील रिलायन्स रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेव्हापासून वैद्यकीय उपचार सुरू असून प्रकृती स्थिर असल्याचे समजते. रुग्णालयात त्यांच्याजवळ आई रश्मी ठाकरे आणि वडील उद्धव ठाकरे उपस्थित आहेत. ठाकरे कुटुंबातील अन्य सदस्यांनीही भेट देऊन प्रकृतीची विचारपूस केली.
महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेजस ठाकरे यांनी अलीकडेच शिवसेनेच्या शाखाभेटी व प्रचार कार्यक्रमांत सहभाग नोंदवला होता. दक्षिण मुंबईतील विविध शाखांना त्यांनी पालक नेत्यांसमवेत भेटी दिल्या होत्या.
कोण आहेत तेजस ठाकरे?
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे कनिष्ठ सुपुत्र म्हणून ओळख असलेले तेजस ठाकरे हे व्यवसायाने वन्यजीव संशोधक आहेत. २०१६ मध्ये त्यांनी गोड्या पाण्यातील खेकड्यांच्या पाच नव्या प्रजातींचा शोध लावला; त्यांपैकी एका प्रजातीला त्यांच्या आडनावावरून नाव देण्यात आले. पश्चिम घाटातील गोड्या पाण्यातील खेकड्यांवरील संशोधनासाठी ते विशेष ओळखले जातात.
२०१९ मध्ये महाराष्ट्रातील पश्चिम घाटात सापाची नवी प्रजाती शोधण्यात आलेल्या संशोधनात त्यांच्या योगदानाची नोंद घेऊन त्या प्रजातीला बोइगा ठाकरे असे नामकरण करण्यात आले होते.
एकंदरित, वन्यजीव संशोधन आणि अधूनमधून राजकीय कार्यक्रमांतील सहभागामुळे तेजस ठाकरे यांचे सार्वजनिक जीवनात वेगळे स्थान निर्माण झाले आहे.


