मुंबई प्रतिनिधी
मुंबई महानगरपालिकेतील महापौर-उपमहापौर निवडणुकीनंतर आता लक्ष लागले आहे ते स्थायी, सुधार, बेस्ट व शिक्षण या वैधानिक समित्यांच्या अध्यक्षपदांवर. त्यातही ‘महापालिकेची तिजोरी’ मानल्या जाणाऱ्या स्थायी समितीचे अध्यक्षपद कोणाकडे जाणार, याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. सोमवारी होणाऱ्या पहिल्या महासभेत समित्यांवरील सदस्यांची नावे जाहीर होणार असल्याने पदवाटपाचे चित्र स्पष्ट होण्याची अपेक्षा आहे.
देशातील सर्वाधिक आर्थिक सामर्थ्य असलेल्या बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये महापौरपदी भाजपच्या रितू तावडे व उपमहापौरपदी संजय घाडी यांच्या निवडीनंतर स्थायी समिती भाजपकडेच राहणार, हे जवळपास निश्चित मानले जात आहे. तर सुधार समितीचे अध्यक्षपद शिवसेना (शिंदे) गटाच्या वाट्याला येण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
युतीत बदललेले समीकरण
पूर्वी शिवसेना-भाजप युतीच्या काळात स्थायी समितीचे अध्यक्षपद शिवसेनेकडेच राहायचे; भाजपला सुधार समितीपुरते समाधान मानावे लागत असे. शिक्षण व बेस्ट समिती अध्यक्षपद मात्र दोन्ही पक्षांत आलटून-पालटून दिले जात होते. यावेळी भाजपने स्थायी समिती आपल्या ताब्यात ठेवण्याचा निर्णय घेतल्याचे संकेत मिळत आहेत.
सोमवारी महासभा
सोमवारी होणाऱ्या पहिल्या महासभेत सभागृह नेते व विरोधी पक्षनेते यांचीही घोषणा अपेक्षित आहे. पालिका निवडणुकीत ८९ जागांसह सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या भाजपकडून गणेश खणकर यांचे सभागृह नेतेपद निश्चित मानले जात आहे. विरोधी पक्षातील सर्वात मोठा गट असलेल्या शिवसेना (ठाकरे) कडून किशोरी पेडणेकर यांची विरोधी पक्षनेते म्हणून निवड होण्याची शक्यता आहे. याचवेळी स्थायी समितीसाठी पक्षनिहाय सदस्यांची यादी जाहीर होणार आहे.
स्थायी समितीचे बलाबल
स्थायी समितीत एकूण २६ सदस्य असतात. शिक्षण समितीचे अध्यक्ष हे पदसिद्ध सदस्य असतात. शिवसेना (शिंदे) गटाने राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांसह स्थापन केलेल्या आघाडीला चार जागा मिळण्याची शक्यता आहे. तर एकूण संख्याबळ असे अपेक्षित आहे. भाजप १०, शिवसेना (ठाकरे) ७, काँग्रेस ३, एमआयएम १, मनसे १. सुधार समितीतही साधारण हेच बलाबल राहणार आहे.
अध्यक्षपदासाठी रस्सीखेच
पालिका अर्थसंकल्प, मोठे प्रकल्प व खर्च प्रस्ताव मंजुरीचा अंतिम अधिकार स्थायी समितीकडे असल्याने अध्यक्षपदाला विशेष महत्त्व आहे. त्यामुळे या पदासाठी पक्षांतर्गत चुरस वाढली आहे. भाजपकडून प्रभाकर शिंदे, राजेश्री शिरवडकर व प्रकाश गंगाधरे यांची नावे चर्चेत असून अंतिम निर्णय नेतृत्वाकडे राहणार आहे. २० फेब्रुवारी रोजी स्थायी व शिक्षण समिती अध्यक्षपदांची निवडणूक होणार आहे.
स्थायी समितीवर नियंत्रण म्हणजे महापालिकेच्या आर्थिक धोरणांवर प्रभाव, त्यामुळेच ‘तिजोरीच्या चाव्या’ कोणाकडे जाणार, याकडे राजकीय व प्रशासकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.


