नाशिकरोड प्रतिनिधी
तंत्रज्ञानाधारित बिलिंग प्रणालीकडे वाटचाल करत महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित (महावितरण) राज्यातील ३ कोटी १६ लाख ग्राहकांसाठी ‘स्मार्ट टीओडी (टाइम ऑफ डे) मीटर’ बसविण्याची मोहीम गतीने राबवत आहे. अचूक बिलिंग, मानवी हस्तक्षेपाशिवाय मीटर रीडिंग आणि नियत वेळेत वीज वापरावर दरसवलत ही या योजनेची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत.
ग्राहकांमध्ये जनजागृती करण्यासाठी ९ ते २३ फेब्रुवारीदरम्यान ‘स्मार्ट मीटर पंधरवडा’ साजरा केला जात आहे. या काळात ग्राहकांना स्मार्ट मीटरची कार्यपद्धती, लाभ आणि गैरसमज याबाबत माहिती दिली जात आहे.
सवलतीचा लाभ कसा?
महाराष्ट्र विद्युत नियामक आयोग यांच्या मान्यतेनुसार सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत वीज वापरावर प्रतियुनिट ८० पैसे ते १ रुपयांपर्यंत सवलत लागू आहे. ही तरतूद १ जुलै २०२५ पासून अंमलात आली असून, दिवसभरातील वापराचे नियोजन केल्यास घरगुती ग्राहकांना बिलात लक्षणीय बचत साधता येणार आहे.
स्मार्ट टीओडी मीटरद्वारे वीज वापराची नोंद थेट महावितरणच्या सर्व्हरवर पाठविली जाणार असल्याने चुकीचे रीडिंग, अंदाजे बिल किंवा घर बंद असल्यामुळे बिल न मिळणे यांसारख्या तक्रारी कमी होण्याची अपेक्षा आहे. बिलिंग प्रक्रियेत पारदर्शकता वाढेल, असा दावा कंपनीने केला आहे.
अतिरिक्त शुल्क नाही; प्रीपेडची सक्ती नाही
या मीटरसाठी कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारले जाणार नसून, ही प्रणाली प्रीपेड नसल्याचे महावितरणने स्पष्ट केले आहे. सध्याप्रमाणेच महिनाअखेरीस वापरानुसार बिल अदा करावे लागेल.
सौरऊर्जेसाठी पूरक
केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजना अंतर्गत सौर पॅनेल बसविणाऱ्या ग्राहकांसाठी स्मार्ट मीटर उपयुक्त ठरणार आहेत. वीजनिर्मिती, स्वतःचा वापर आणि ग्रीडला दिलेली वीज यांचा अचूक तपशील उपलब्ध होणार असल्याने ऊर्जेचे व्यवस्थापन सुलभ होईल.
दरम्यान, स्मार्ट मीटरमुळे वीजदर वाढतील, असा समज काही ठिकाणी व्यक्त केला जात आहे. मात्र टीओडी तंत्रज्ञानामुळे वीज वापराचे नियोजन शक्य होऊन उलट बिलात बचत होऊ शकते, असे महावितरणच्या नाशिक परिमंडळाने स्पष्ट केले आहे. ग्राहकांनी अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत माहितीकडेच लक्ष द्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.


