नाशिक प्रतिनिधी
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनाने राज्यभर शोककळा पसरलेली असतानाच, या दुःखद घटनेशी संबंधित आणखी एक करुण अंत नाशिक जिल्ह्यात घडला. अजित पवार यांचे कट्टर समर्थक आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते सुदाम बोडके (वय ६३) यांचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला. दादांच्या निधनाची बातमी समजताच ते मानसिकदृष्ट्या पूर्णतः कोलमडून पडले होते.
नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील रहिवासी असलेले सुदाम बोडके हे सामाजिक व राजकीय क्षेत्रात सक्रिय होते. बुधवारी सकाळी ते त्यांच्या एका नातेवाइकाच्या दशक्रिया विधीसाठी गेले असताना, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातात झालेल्या निधनाची बातमी त्यांना समजली. ही बातमी ऐकताच बोडके यांना मोठा मानसिक धक्का बसला. उपस्थितांशी ते भावनिक स्वरात अजित पवार यांच्याबद्दल भरभरून बोलत होते. “कामाचा माणूस हरपला,” अशी भावना ते वारंवार व्यक्त करत होते, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.
यानंतर बोडके हे दुचाकीवरून नाशिककडे रवाना झाले. मात्र दादांच्या निधनाच्या धक्क्याने ते अक्षरशः अस्वस्थ झाले होते. नाशिकच्या मार्केट यार्ड परिसरात पोहोचल्यानंतर त्यांना छातीत दुखणे, अस्वस्थता जाणवू लागली. प्रकृती बिघडत असल्याचे लक्षात येताच ते तातडीने एका खासगी रुग्णालयात गेले. मात्र तपासणी सुरू असतानाच ते अचानक कोसळले. डॉक्टरांनी तात्काळ तपासणी करून त्यांना मृत घोषित केले.
हृदयविकाराच्या तीव्र झटक्यामुळेच बोडके यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले. त्यांच्या निधनाची बातमी कळताच दिंडोरी परिसरासह नाशिक जिल्ह्यात शोककळा पसरली. अनेक कार्यकर्ते, ग्रामस्थ आणि परिचितांनी रुग्णालयात धाव घेतली.
सुदाम बोडके हे राष्ट्रवादी काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून ओळखले जात होते. अजित पवार यांच्याशी त्यांची वैचारिक नाळ घट्ट जोडलेली होती. पक्षाचे कार्यक्रम, आंदोलने, संघटनात्मक कामांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग असायचा. दादांच्या नेतृत्वावर त्यांचा ठाम विश्वास होता. त्यामुळेच अजित पवार यांच्या अकाली निधनाचा धक्का त्यांना सहन न झाल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले.
बोडके यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, तीन मुली, सुना आणि नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांच्या जाण्याने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनामुळे राज्यभरातील समर्थक, कार्यकर्ते आणि सामान्य नागरिक हळहळ व्यक्त करत आहेत. बारामती येथे पार पडलेल्या अंत्यविधीला मोठा जनसागर लोटला होता. शोकाकुल वातावरणात ‘कामाचा माणूस हरपला’ आणि ‘आम्ही पोरके झालो’ अशा भावना अनेकांच्या डोळ्यांतून व्यक्त होत होत्या. या दुःखद पार्श्वभूमीवर सुदाम बोडके यांचा मृत्यू ही घटना अनेकांना अधिकच हेलावून टाकणारी ठरली आहे.


