नाशिक प्रतिनिधी
नाशिक जिल्ह्यातील आंबेडकरी-रिपब्लिकन चळवळीतील कार्यकर्त्यांवर राजकीय सूडातून खोटे गुन्हे दाखल होऊ देणार नाही, असे ठाम आश्वासन नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी दिले. शिवशक्ती-भीमशक्ती युतीचे प्रणेते तानसेन ननावरे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने पोलीस आयुक्तालयात भेट घेतल्यानंतर कर्णिक यांनी हे आश्वासन दिले.
पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे महाराष्ट्र अध्यक्ष गणेश उन्हावने यांच्यावर उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्याच्या पार्श्वभूमीवर आंबेडकरी कार्यकर्त्यांत संताप व्यक्त होत होता. कार्यकर्त्यांच्या तक्रारीनंतर ननावरे यांनी आयुक्तांची भेट घेऊन चळवळीतील कार्यकर्त्यांबाबत पोलिसांचा दुजाभाव व राजकीय दबावतंत्र होत असल्याचा आरोप केला. यासंदर्भात निवेदनही सादर करण्यात आले.
आंबेडकरी-रिपब्लिकन कार्यकर्ते संविधानिक मार्गाने चळवळ उभी करीत असताना त्यांचे मनोबल खच्चीकरण करण्यासाठी खोट्या तक्रारींवर गुन्हे दाखल केले जात असल्याची बाब ननावरे यांनी निदर्शनास आणून दिली. त्याची गंभीर दखल घेत आयुक्त कर्णिक यांनी संबंधित अधिकाऱ्यांना शहानिशा केल्याशिवाय गुन्हे नोंदवू नयेत, तसेच राजकीय वादातून येणाऱ्या तक्रारींची दोन्ही बाजू तपासूनच कारवाई करावी, अशा स्पष्ट सूचना दिल्या.
यापुढे आंबेडकरी-रिपब्लिकन चळवळीतील कार्यकर्त्यांशी कोणताही दुजाभाव होऊ दिला जाणार नाही, असेही कर्णिक यांनी शिष्टमंडळाशी बोलताना सांगितले.
या वेळी शिष्टमंडळात गणेश उन्हावने, शशी उन्हावने, युआरपी सफाई कामगार आघाडीचे महाराष्ट्र अध्यक्ष ईश्वर झंझोटड, कोकण संपर्कप्रमुख आनंद जाधव, चर्मकार आघाडीचे महाराष्ट्र अध्यक्ष श्याम वाडकर, युवा नेते उद्देश सोनवणे आदी पदाधिकारी उपस्थित होते.


