सातारा प्रतिनिधी
सातारा जिल्हा परिषद निवडणुकीच्या निकालाने जिल्ह्याच्या राजकारणात अनपेक्षित वळण घेतले असून, भाजपला बहुमतापासून दूर ठेवत मतदारांनी त्रिशंकू कौल दिला आहे. एकहाती सत्ता स्थापनेच्या अपेक्षांना धक्का बसल्याने आता कोणता पक्ष किंवा आघाडी जिल्हा परिषदेची सूत्रे हाती घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
भाजप सर्वाधिक जागा मिळवूनही बहुमत गाठू शकलेला नाही. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि शिंदे गटाच्या शिवसेनेने लक्षणीय कामगिरी करत भाजपसमोर सत्तासमीकरणाचे आव्हान उभे केले आहे. या दोन्ही पक्षांची एकत्रित संख्या भाजपपेक्षा अधिक असल्याने संभाव्य सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग येण्याची शक्यता आहे.
राष्ट्रवादी–शिवसेनेची मुसंडी, भाजपला फटका
पूर्वी काँग्रेसचा बालेकिल्ला आणि त्यानंतर दीर्घकाळ राष्ट्रवादीच्या वर्चस्वाखाली असलेल्या साताऱ्यात, मागील लोकसभा व विधानसभा निवडणुकांत भाजपने मोठे यश मिळवले होते. ११ पैकी ९ आमदार भाजपचे असल्याने जिल्हा परिषदेतही भाजपची एकहाती सत्ता येईल, अशी चर्चा होती. मात्र, सर्वच प्रमुख पक्षांनी स्वबळावर निवडणूक लढवल्याने मतांचे विभाजन झाले आणि त्याचा फटका भाजपला बसला.
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि शिंदे गटाच्या शिवसेनेने प्रभावी कामगिरी करत सत्तासमीकरणात निर्णायक भूमिका मिळवली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) मात्र अपेक्षेपेक्षा पिछाडीवर राहिला असून, मोजक्याच जागांवर समाधान मानावे लागले.
दिग्गजांच्या कुटुंबीयांना पराभवाचा धक्का
या निवडणुकीत अनेक राजकीय दिग्गजांच्या कुटुंबीयांना पराभव स्वीकारावा लागला. माजी मंत्री दिवंगत मदनराव पिसाळ यांची नात दीप्ती पिसाळ, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या भावजय भारती गोरे, आण्णासाहेब पाटील महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांच्या पत्नी प्राची पाटील, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष नितीन भरगुडे-पाटील तसेच जिल्हा बँकेचे संचालक ज्ञानदेव रांजणे यांच्या पत्नी अर्चना रांजणे यांचा पराभव विशेष लक्षवेधी ठरला.
काही दिग्गजांची पुन्हा ‘झेडपी’त एन्ट्री
माजी मंत्री दिवंगत विलासराव उंडाळकर यांचे सुपुत्र उदयसिंह पाटील-उंडाळकर यांनी सलग दुसऱ्यांदा जिल्हा परिषदेत प्रवेश केला. माण तालुक्यातून जिल्हा बँकेचे संचालक अनिल देसाई विजयी झाले. शिरवळमधून माजी अध्यक्ष उदय कबुले यांनी भाजपमध्ये प्रवेश केलेल्या नितीन भरगुडे-पाटील यांचा पराभव करत लक्ष वेधले.
भाजपचे राजू भोसले यांनी कारी गटातून सर्वाधिक, सुमारे १६ हजार मतांच्या फरकाने विजय मिळवला. खटावमधून शिवसेनेच्या प्रिया शिंदे, तर कोळकी गटातून सह्याद्री कदम यांनी यश संपादन केले.
पाटणमध्ये शिवसेनेचे एकहाती वर्चस्व
पाटण तालुक्यात शिंदे गटाच्या शिवसेनेने निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले आहे. जिल्हा परिषदेच्या ७ पैकी ६ आणि पंचायत समितीच्या १४ पैकी १३ जागांवर शिवसेनेने विजय मिळवला. पालकमंत्री शंभूराज देसाई यांचा प्रभाव या निकालातून अधोरेखित झाला आहे.
काँग्रेसची मर्यादित पण लढवय्या कामगिरी
भाजप, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या जोरदार लढतीत काँग्रेसने मर्यादित यश मिळवले असले, तरी कराड उत्तर व दक्षिण भागात दाखवलेली झुंज पक्षासाठी दिलासादायक मानली जात आहे.
अंतिम जागावाटप
भाजप : २७
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) : २०
शिवसेना (शिंदे गट) : १५
काँग्रेस : १
इतर : २
त्रिशंकू स्थितीमुळे पुढील काही दिवस सातारा जिल्ह्याच्या राजकारणात हालचालींना वेग येण्याची चिन्हे असून, सत्ता स्थापनेसाठी कोणती आघाडी आकार घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


