मुंबई प्रतिनिधी
तुर्भे लो-लेव्हल जलाशयातील महत्त्वाच्या जलवाहिनीवर जलद्वार बसविण्याच्या आणि जोडणीच्या कामासाठी गुरुवार, १२ फेब्रुवारीपासून मुंबईतील ‘एम’ पूर्व व ‘एम’ पश्चिम विभागांतील पाणीपुरवठा सलग ३० तास बंद ठेवण्यात येणार आहे. मध्यरात्री २ वाजल्यापासून ते शुक्रवारी, १३ फेब्रुवारी रोजी सकाळी ८ वाजेपर्यंत संपूर्ण पाणीपुरवठा बंद राहील. त्यानंतर काही भागांत कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी पाण्याचा वापर जपून करण्याचे आवाहन महानगरपालिकेने केले आहे.
महापालिकेच्या जलअभियांत्रिकी विभागाकडून एम पूर्व आणि एम पश्चिम विभागातील पाणीपुरवठा अधिक सक्षम करण्यासाठी तांत्रिक कामे हाती घेण्यात आली आहेत. तुर्भे लो-लेव्हल जलाशयामध्ये १२०० मिलिमीटर व्यासाच्या आवक जलवाहिनीवर १२०० मिलिमीटर व्यासाचे जलद्वार बसविणे, तसेच संबंधित जलवाहिनीची टनेल शाफ्टशी १२०० मिलिमीटर व्यासाची जलजोडणी करणे ही कामे या कालावधीत पूर्ण केली जाणार आहेत. या कामांमुळे भविष्यातील पाणीपुरवठा सुरळीत व अधिक स्थिर राहण्यास मदत होणार असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
कमी दाबाने पाणीपुरवठा
१३ फेब्रुवारी रोजी सकाळी ८ नंतर पाणीपुरवठा पूर्ववत सुरू होईल; मात्र सुरुवातीच्या काही तासांत तो कमी दाबाने होऊ शकतो. त्यामुळे पुढील दोन ते तीन दिवस पाणी जपून वापरण्याचा सल्ला देण्यात आला आहे. तसेच पाईपलाईनवरील कामांनंतर पाण्याच्या गुणवत्तेबाबत खबरदारी म्हणून काही दिवस पाणी उकळून पिण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.
‘एम’ पूर्व विभागातील प्रभावित भाग
एचपीसीएल रिफायनरी व वसाहत, वरुण बेव्हरेजेस, बीएआरसी, गव्हाणपाडा, इंडियन ऑईल कंपनी लिमिटेड, बीपीसीएल वसाहत, टाटा वसाहत, नित्यानंद बाग, राणे चाळ, आरसीएफ कॉलनी, जुनी रिफायनरी परिसर, भारत नगर, जे प्लॉट, हशू अडवाणी नगर, आणिक गाव, एमएसीबी वसाहत, सह्याद्रीनगर, आरएनए उद्यान, विविध म्हाडा वसाहती, रॉकलाईन व व्हिडिओकॉन इमारती, एसजी केमिकल परिसर, प्रयागनगर, ओम-गणेश नगर, राहुल नगर, अशोक नगर आदी भागांत गुरुवारी मध्यरात्री २ ते शुक्रवारी सकाळी ८ या कालावधीत पाणीपुरवठा पूर्णतः बंद राहील.
‘एम’ पश्चिम विभागातील प्रभावित भाग
बीपीटी, टाटा, बीपीसीएल परिसर, माहुल गाव, मरवली चर्च, माहुल एसआरए, फारुख गल्ली, खडी मशीन, आरसी मार्ग परिसर, सिंधी सोसायटी, वाशी नाका, अंबा पाडा, जिजामाता नगर, साईलीला रामटेकडी, तोलाराम टॉवर, चेंबूर कॅम्प, गणेश नगर, कोकण नगर, वाशीगाव, म्हाडा इमारती, मुकुंद नगर एसआरए, लक्ष्मी नगर, मितुल एन्कलेव, म्हैसूर कॉलनी, विजय नगर आदी भागांनाही या बंदचा फटका बसणार आहे.
महानगरपालिकेने संबंधित भागांतील नागरिकांनी आवश्यक त्या प्रमाणात पाणीसाठा करून ठेवावा, तसेच अनावश्यक वापर टाळावा, असे आवाहन केले आहे. औद्योगिक व व्यापारी आस्थापनांनीही पर्यायी नियोजन करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
३० तासांच्या या नियोजित बंदमुळे मानखुर्द-चेंबूर पट्ट्यातील दैनंदिन व्यवहारांवर तात्पुरता परिणाम होण्याची शक्यता असून, काम पूर्ण झाल्यानंतर पाणीपुरवठा अधिक कार्यक्षम होईल, असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे.


