नागपूर प्रतिनिधी
विदर्भाच्या औद्योगिक विकासाला गती देणाऱ्या महत्त्वाच्या घोषणांचा पाऊस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात पाडला. दावोस येथील जागतिक आर्थिक परिषदेतून राज्यासाठी मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक आकर्षित केल्यानंतर नागपुरात आयोजित ‘ॲडव्हांटेज विदर्भ २०२६ : खासदार औद्योगिक महोत्सव’ाच्या उद्घाटनप्रसंगी त्यांनी विदर्भासाठी औद्योगिक आणि पायाभूत सुविधांच्या दृष्टीने निर्णायक ठरणाऱ्या दोन महत्त्वाच्या घोषणांची माहिती दिली.
महिंद्रा अँड महिंद्रा समूह नागपुरात सुमारे १५ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करत एकात्मिक ऑटोमोबाईल उत्पादन प्रकल्प उभारणार असून, या माध्यमातून विदर्भात पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणावर ऑटोमोबाईल उद्योग येणार आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले. महिंद्राच्या नेक्स्ट जनरेशन ईव्ही आणि इतर वाहननिर्मितीचा हा प्रकल्प २०२८ पासून कार्यान्वित होण्याची अपेक्षा असून, सप्लाय युनिट छत्रपती संभाजीनगरमध्ये उभारले जाणार आहे.
“आजपर्यंत ऑटोमोबाईल उद्योग पुणे केंद्रित राहिला. आता नागपूर, संभाजीनगर आणि नाशिक ही नवी औद्योगिक केंद्रे म्हणून विकसित होतील,” असे सांगत फडणवीस यांनी या गुंतवणुकीमुळे विदर्भात मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मिती होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला.
विदर्भातील औद्योगिक विकासाचा उल्लेख करताना फडणवीस म्हणाले की, गेल्या दहा वर्षांत या भागाचा चेहरा बदलण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. “गडचिरोलीतील खनिज संपत्तीवर दोन दशकं फक्त चर्चा झाली; प्रत्यक्ष कृती २०१४ नंतर सुरू झाली. आज गडचिरोली आणि परिसरात औद्योगिक इकोसिस्टीम उभी राहत आहे. येथे ग्रीन स्टील तयार करून चीनपेक्षाही स्वस्त स्टील निर्माण करण्याचा आमचा मानस आहे,” असे त्यांनी नमूद केले.
औद्योगिक विकासासाठी ‘मॅग्नेट’ तयार करणे आवश्यक असल्याचे सांगत, राज्यात केवळ मुंबई-ठाणेपुरते मर्यादित न राहता आता रायगड, संभाजीनगर, नागपूर, अमरावती यांसारख्या भागांत नवी औद्योगिक केंद्रे उभी केली जात असल्याचे त्यांनी सांगितले. टाटा एरोस्पेसकडून नागपुरात ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’ उभारण्यात येणार असून, सोलर मॉड्युल उत्पादनाची औद्योगिक साखळीही नागपूर परिसरात विकसित होत आहे. अमरावती येथे आशियातील सर्वात मोठे एव्हिएशन स्कूल उभारले जात असून, येत्या जुलैमध्ये त्याचे उद्घाटन होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
विदर्भात राज्यातील सर्वात मोठा नदीजोड प्रकल्प
विदर्भाच्या जलसंपदा व्यवस्थेसाठी निर्णायक ठरणाऱ्या घोषणेत मुख्यमंत्री फडणवीस यांनी महाराष्ट्रातील सर्वात मोठा नदीजोड प्रकल्प विदर्भात राबवण्याची माहिती दिली. भंडाऱ्यातील वैनगंगा नदीला बुलढाण्यातील नळगंगा नदीशी जोडण्यासाठी सुमारे ५०० किलोमीटर लांबीची कृत्रिम नदी निर्माण केली जाणार आहे. या प्रकल्पामुळे विदर्भातील सर्व जिल्ह्यांना पाणीपुरवठा होणार असून, वर्ध्याच्या पश्चिमेकडील पावसाअभावी त्रस्त भागातील सिंचन व्यवस्था बळकट होणार आहे.
या नदीजोड प्रकल्पाचे काम याच वर्षी सुरू केले जाणार असल्याचे सांगत, पाण्याच्या उपलब्धतेमुळे उद्योगांना विदर्भात येण्यासाठी अनुकूल वातावरण निर्माण होईल, असा दावा मुख्यमंत्र्यांनी केला.
दावोस परिषदेतून राज्यासाठी ३० लाख कोटी रुपये, तर विदर्भासाठी सुमारे पावणे चार लाख कोटी रुपयांची गुंतवणूक आकर्षित करण्यात आल्याची माहिती देत, ही गुंतवणूक प्रामुख्याने विकासात मागे राहिलेल्या जिल्ह्यांसाठी असल्याचेही फडणवीस यांनी स्पष्ट केले.


