उमेश गायगवळे,मुंबई
काही बातम्या असतात ज्या वाचून डोळे थांबतात.
काही बातम्या असतात ज्या ऐकून शब्द सुचत नाहीत.
आणि काही घटना अशा असतात ज्या घडल्या यावर विश्वास ठेवायला मन तयार होत नाही.
२८ जानेवारी २०२६ ही तशीच एक तारीख.
त्या दिवशी महाराष्ट्राने केवळ राज्याचे उपमुख्यमंत्री गमावले नाहीत.
महाराष्ट्राने आपला दादा गमावला.
अजितदादा पवार यांचे दुर्दैवी विमान अपघातात झालेले निधन हा केवळ अपघात नव्हता. तो राज्याच्या राजकीय, प्रशासकीय आणि सामाजिक आयुष्याला बसलेला जबर धक्का होता. दादांसोबत त्यांचा अंगरक्षक, दोन वैमानिक आणि एका क्रू मेंबरचेही प्राण गेले. त्या एका घटनेत अनेक घरं उद्ध्वस्त झाली, पण त्याहून मोठं घर, महाराष्ट्राचं घर पोरकं झालं.
राजकारणात मृत्यू घडतात.
नेते जातात, नवे येतात.
पण काही जाणं हे केवळ व्यक्तीचं नसतं, ते आधाराचं जाणं असतं.
दादांचं जाणं तसंच आहे.
त्या दिवशी महाराष्ट्रात राजकीय मतभेद थांबले. विरोधकही गप्प झाले. सत्ताधारीही स्तब्ध झाले. कारण अजितदादा हे फक्त एका पक्षाचे नेते नव्हते; ते महाराष्ट्राच्या सत्ताकेंद्रातील स्थिर घटक होते. कुणाला आवडो वा ना आवडोत, पण “अजितदादा आहेत” ही भावना राज्याच्या प्रशासनाला एक ठामपणा देणारी होती.
आज तो ठामपणा हरवला आहे.
दादांच्या अंत्यविधीला जमलेली गर्दी ही केवळ पक्षनिष्ठेची नव्हती. ती कृतज्ञतेची होती. हजारो चेहरे, हजारो डोळे, आणि प्रत्येकाच्या मनात एकच प्रश्न“आता कोण?”
हा प्रश्न केवळ राजकीय नेतृत्वाचा नाही, तर विश्वासाचा आहे.
कारण अजितदादा म्हणजे “कामाचा माणूस” होते हे बिरुद सहज मिळालेलं नव्हतं. ते त्यांनी वर्षानुवर्षे आपल्या वागण्यातून कमावलं होतं. तक्रार घेऊन आलेल्या सामान्य माणसाला त्यांनी कधी थेट नकार दिला नाही. कधी रागावले, कधी झापले, कधी थांबायला लावलं, पण हात झटकला नाही. त्यामुळेच मंत्रालयात असो किंवा मतदारसंघात, लोक म्हणायचे, “दादांकडे गेलं की काहीतरी होईल.”
आज त्या “काहीतरी होईल” या आशेवर पाणी पडलं आहे.
अजितदादांचा राजकीय प्रवास हा वारशातून मिळालेल्या सत्तेचा प्रवास नव्हता, तर तालमीत घडलेला प्रवास होता. सिल्व्हर ओक ही केवळ नाव नव्हत ; ती राजकारणाची विद्यापीठ होत. दिल्लीपासून गल्लीपर्यंतचं राजकारण त्यांनी पाहिलं, समजून घेतलं आणि आत्मसात केलं. त्यामुळेच ते बोलण्याआधी विचार करत, आणि निर्णय घेतल्यावर मागे हटत नसत.
९०च्या दशकात जेव्हा राज्याच्या राजकारणात तरुण रक्ताला संधी दिली जात होती, तेव्हा अजित पवार व्यासपीठावर चमकत नव्हते. पण पडद्यामागे ते सगळं टिपत होते,माणसं, प्रवृत्ती, निष्ठा आणि संधीसाधूपणा. त्यामुळेच पुढे जेव्हा ते सत्ताकेंद्रात आले, तेव्हा ते कोणासाठीही अनपेक्षित नव्हतं.
त्यांनी ‘प्रोटोकॉल’ पाळला. वरिष्ठांचा मान राखला. पण त्याच वेळी पक्षावरची पकड इतकी मजबूत केली की आमदार, कार्यकर्ते, पदाधिकारी सगळेच त्यांच्याकडे पाहू लागले. कारण दादांनी कधीही माणसं केवळ आकड्यांसारखी पाहिली नाहीत. त्यांनी माणसं म्हणून त्यांच्याशी वागणूक दिली.
त्यांची लोकप्रियता सत्तेची देण नव्हती; ती संपर्काची देण होती.
आज समाजमाध्यमांवर फिरणारी त्यांची दृश्यंय, साध्या कार्यकर्त्याच्या लग्नात जमिनीवर बसून जेवण करणारे दादा हि केवळ भावनिक क्षणचित्रं नाहीत. ती त्यांच्या राजकारणाची शैली सांगतात. सत्ता असूनही साधेपणा न सोडणं, आणि मोठेपणा असूनही माणुसकी जपणं हे आजच्या राजकारणात दुर्मिळ होत चाललेलं मूल्य होतं.
सुटला शरद पवार यांना ‘तेल लावलेला पैलवान’ म्हटलं जायचं. त्या तालमीत घडलेला अजित पवार हा त्यांचा सर्वात धारदार शिष्य होता. डावपेच, संयम, योग्य वेळी आक्रमकपणा सगळं त्यांनी अचूक साधलं. म्हणूनच अनेकदा राजकीय मैदानात ते प्रतिस्पर्ध्यांसाठी अवघड ठरले.
पण आज प्रश्न असा आहे की-
त्या धारदारपणाची, त्या निर्णयक्षमतेची जागा कोण घेणार?
अजितदादा गेल्यानंतर निर्माण झालेली पोकळी केवळ पदाची नाही. ती नेतृत्वाच्या शैलीची आहे. आजच्या राजकारणात वक्ते भरपूर आहेत, घोषणाबाज नेते आहेत, पण “काम होईल” याची खात्री देणारा नेता निराळा आहे.
दादा गेले, आणि त्यांच्यासोबत एक विश्वास गेला.
आठवडा उलटून गेला आहे. शोकसभा झाल्या आहेत. श्रद्धांजली वाहिल्या गेल्या आहेत, सुरू आहेत. पण महाराष्ट्र अजूनही सावरलेला नाही. कारण काही व्यक्तींचं जाणं हे काळाच्या ओघात विरघळत नाही. ते कायमची रेघ उमटवून जातं.
अजितदादा पवार हे असंच एक नाव आहे.
इतिहास त्यांच्या निर्णयांवर चर्चा करेल. टीका-विश्लेषण होईल. मतभेदही राहतील. पण एक गोष्ट नाकारता येणार नाही.
महाराष्ट्राच्या राजकारणात ते शेवटपर्यंत काम करत राहिले.
आज महाराष्ट्र एकटाच झाला आहे.
पण दादांच्या आठवणी, त्यांचा आवाज, त्यांची कार्यपद्धती-
या सगळ्या काळाच्या पलीकडे जाऊन टिकतील.
दादा गेले…
पण त्यांच्या जाण्याने निर्माण झालेली शांतता खूप काही बोलून जाते,
दादांच्या आठवणील घटना समाज माध्यमांतून येतच राहणार आहेत.


