उमेश गायगवळे, मुंबई
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांचा बुधवारी झालेल्या अपघाती निधनाने संपूर्ण महाराष्ट्रावर जणू काळाची झडप पडली आहे. एका क्षणात सर्व काही थांबल्यासारखे झाले. राजकारणाच्या दैनंदिन गडबडीत, आरोप-प्रत्यारोपांच्या कोलाहलात नेहमी ठामपणे उभा असलेला, सकाळी-संध्याकाळी कामाच्या वेगाने राज्याला गती देणारा नेता असा अचानक काळाच्या पडद्याआड जाईल, यावर कुणाचाही विश्वास बसत नाही. त्यामुळेच त्यांच्या अकाली जाण्याने केवळ एक सत्ताधारी नेता नव्हे, तर स्पष्टवक्ता, शब्दाला टिकणारा, माणुसकी जपणारा आणि सर्वसामान्यांमध्ये मिसळून काम करणारा ‘आपला माणूस’ हरपल्याची भावना महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून व्यक्त होत आहे.

अपघाताची प्राथमिक माहिती समोर आली, तेव्हा क्षणभर राज्य स्तब्ध झाले. ‘दादा सुखरूप असतील’, ‘काही गंभीर नसेल’ अशीच भावना प्रत्येक कार्यकर्ता, नागरिक, महिला, युवकांच्या मनात होती. सोशल मीडियावर प्रार्थना, आशा आणि काळजी यांचा एकच पूर उसळला होता. मात्र काही वेळातच त्यांच्या दुःखद निधनाची बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरात बुडाला. राजकारणात अनेक चढ-उतार पाहिलेल्या, संकटांवर मात करणाऱ्या अजितदादांचा असा अंत व्हावा, ही कल्पनाच अनेकांना असह्य झाली, अनेक नेते,पदाधिकारी,कार्यकर्ते ढसाढसा रडताना दिसले. अनेकांना अश्रू अनावर झाले.

अजितदादा म्हटले की डोळ्यांसमोर एक ठळक, ठसठशीत चित्र उभे राहते. समाजकारण काय असतं आणि राजकारण काय असतं, यातील सीमारेषा कृतीतून दाखवणारा नेता म्हणजे अजित पवार. सडेतोड भाषा, थेट प्रश्न आणि तितकेच थेट उत्तर हे त्यांच्या स्वभावाचे वैशिष्ट्य होते. कुठलाही आडपडदा न ठेवता मत मांडणे, चुका दिसल्या तर त्यावर बोट ठेवणे आणि कामात हलगर्जीपणा दिसला तर संबंधितांना झापणे, हे त्यांच्या कामकाजाचा अविभाज्य भाग होता. मात्र या कडक शिस्तीतही माणुसकी हरवली नव्हती. एखादा कार्यकर्ता गोंधळलेला दिसला, की ‘जाऊद्या, गमतीचा भाग सोडून द्या’ असे म्हणत वातावरण हलके करण्याची त्यांची हातोटी अनेकांनी अनुभवली आहे.

प्रशासनावर असलेली त्यांची पकड विलक्षण होती. फाइल्स, योजना, निर्णयप्रक्रिया यांची त्यांना असलेली माहिती केवळ वरवरची नव्हे, तर मुळापासूनची होती. कोणत्या खात्याची अडचण कुठे आहे, कोणत्या योजनेत निधी अडतोय, कोणत्या अधिकाऱ्याच्या टेबलावर फाइल रखडली आहे. हे त्यांना नेमकेपणाने ठाऊक असे. ही प्रशासकीय जाण त्यांना घरातूनच मिळाली होती. मा. शरद पवार यांच्याकडून त्यांनी राजकारणाचे धडे घेतले, संयम, दूरदृष्टी, लोकांशी संवाद आणि निर्णयक्षम नेतृत्व. त्यामुळेच ते सात वेळा उपमुख्यमंत्री झाले. मुख्यमंत्री होण्याचे स्वप्न मात्र प्रत्यक्षात उतरले नाही; ही सल त्यांच्या समर्थकांच्या मनात कायम राहिली.

सामान्य माणसाच्या अडचणी तात्काळ कशा सोडवता येतील, हा प्रश्न अजितदादांच्या राजकारणाचा केंद्रबिंदू होता. साधा शेतकरी असो, विद्यार्थी असो, महिला बचतगटातील सदस्य असो किंवा एखादा लहान व्यावसायिक, त्याच्या प्रश्नांपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांनी पक्षीय साखळीतल्या प्रत्येक घटकाला जबाबदारी दिली होती. पदाधिकारी, कार्यकर्ता आणि सामान्य नागरिक यांच्यातील दरी कमी करण्याचा त्यांचा प्रयत्न सातत्याने दिसून आला. त्यामुळेच अजितदादा तरुणांच्या गळ्यातले ताईत ठरले.

त्यांचा दिवस पहाटेच सुरू होत असे. सकाळी सहा-साडेसहाला पाहणी दौऱ्यावर पोहोचलेले दादा पाहून अनेकदा अधिकाऱ्यांची तारांबळ उडायची. ‘साहेब इतक्या लवकर?’ असे पुटपुटत अधिकारी फाइल्स जमवताना दिसायचे. कामात दिरंगाई, टाळाटाळ किंवा केवळ कागदी पूर्तता यांना त्यांच्या कारकिर्दीत फारसा वाव नव्हता. कधी कधी त्यांच्या रोखठोक शब्दांनी अधिकारी धास्तावले, तरी त्या धाकामागे काम पूर्ण व्हावे, जनतेला दिलासा मिळावा, हाच हेतू असे. ‘मी कामाचा माणूस आहे’ हे त्यांचे वाक्य केवळ घोषणा नव्हे, तर त्यांच्या दैनंदिन कामकाजाचा आरसा होते.

विधानसभेतील त्यांची भाषणे ही त्यांच्या अभ्यासाची साक्ष देणारी असत. आकडेवारी, योजना, तरतुदी, महसूल आणि खर्च यांचे बारकावे ते सहजपणे मांडत. अर्थ खात्याची असलेली सखोल जाण ही त्यांच्या राजकीय कारकिर्दीतील मोठी ताकद होती. काटकसर कशी करावी, उत्पन्नाचे स्रोत कसे वाढवावेत, योजनांचा निधी योग्य ठिकाणी कसा वळवावा, याबाबत त्यांनी घेतलेले अनेक निर्णय वाखाणण्याजोगे ठरले. काही निर्णय अल्पकालीन टीकेचे धनी झाले, पण दीर्घकालीन दृष्टीने राज्याच्या अर्थकारभाराला शिस्त लावणारे ठरले.

महाराष्ट्राच्या भूगोलाइतकीच त्यांना राज्याच्या समाजजीवनाची ओळख होती. जिल्हा, तालुका, गाव कोणत्या भागात पाणीटंचाई आहे, कुठे शिक्षणाची अडचण आहे, कुठे रस्ते अपुरे आहेत, कुठे रोजगाराची गरज आहे. याची त्यांना दांडगी माहिती होती. दौऱ्यांदरम्यान एखाद्या गावात थांबून ते स्थानिकांशी थेट संवाद साधायचे. अनेकदा अधिकाऱ्यांना बाजूला ठेवून ते थेट ग्रामस्थांशी बोलत आणि त्यांच्या अडचणी ऐकून घेत.
शिक्षण क्षेत्राबाबत अजितदादांची भूमिका विशेष उल्लेखनीय ठरते. शाळा, महाविद्यालये, तांत्रिक शिक्षण संस्था, वसतिगृहे, या साऱ्यांविषयी ते सातत्याने माहिती घेत. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या संधी मिळाव्यात, यासाठी त्यांनी अनेक निर्णय घेतले. एखाद्या वसतिगृहात पाणी, वीज किंवा जेवणाचा प्रश्न निर्माण झाला, तर त्यावर तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना ते देत. एका बैठकीत त्यांनी अधिकाऱ्यांना स्पष्टपणे सांगितले होते, ‘विद्यार्थ्यांच्या मूलभूत गरजांवर तडजोड चालणार नाही.’
विद्यार्थ्यांशी संबंधित अनेक किस्से त्यांच्या संवेदनशीलतेची साक्ष देतात. एका ग्रामीण भागातील विद्यार्थिनीने शिक्षणासाठी मदतीची विनंती केली असता, त्यांनी केवळ मदतच केली नाही, तर संबंधित अधिकाऱ्यांना ‘पुढे असे प्रकार होऊ नयेत’ याची खबरदारी घेण्यास सांगितले. अशा अनेक छोट्या-छोट्या प्रसंगांतून त्यांची माणुसकी दिसून आली.

विकासकामांच्या बाबतीत अजितदादांचा वेग आणि निर्णयक्षमता वेगळीच होती. पायाभूत सुविधा, रस्ते, पूल, पाणीपुरवठा योजना, सिंचन प्रकल्प, शहरी आणि ग्रामीण विकास, या सगळ्या क्षेत्रांत त्यांनी अनेक कामांना चालना दिली. ‘काम कागदावर नव्हे, तर जमिनीवर दिसायला हवे’ हा त्यांचा आग्रह असे. त्यामुळे अनेक रखडलेले प्रकल्प मार्गी लागले. काही ठिकाणी स्थानिक वाद, निधीअभावी कामे थांबली होती; तिथे त्यांनी स्वतः लक्ष घालून प्रश्न सोडवले.
राजकारणातील त्यांच्या शैलीबद्दल मतभेद असू शकतात, टीकाही झाली, पण त्यांच्या कामाच्या क्षमतेबाबत फारसा वाद नाही. ते कठोर होते, थेट होते, कधी कधी रागीटही वाटायचे; पण त्या कठोरतेमागे राज्याच्या हिताची तळमळ होती. त्यांचे निर्णय लोकांना पटले नाहीत, तरी ‘दादा कामासाठीच बोलले’ अशी भावना अनेकांच्या मनात राहिली.

आज त्यांच्या जाण्याने महाराष्ट्राने एक अनुभवी, कार्यक्षम आणि वेगळ्या धाटणीचा नेता गमावला आहे. त्यांच्या आठवणी, त्यांची वाक्ये, त्यांची शैली आणि त्यांनी सुरू केलेली कामे, हे सारे काळाच्या ओघात इतिहासाचा भाग होतील. पण “अजितदादा म्हणजे कामाचा माणूस” ही ओळख मात्र कायम राहील.
महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात दादांबद्दल दाटून आलेली भावना एका वाक्यात सांगायची झाली, तर ती एवढीच, असा राजकारणी, असा समाजकारणी पुन्हा होणे नाही.


