लोणावळा प्रतिनिधी
मुंबई–पुणे द्रुतगती मार्गावरील प्रवाशांचा प्रवास काही केल्या सुकर होताना दिसत नाही. खंडाळा घाटातील अडथळे दूर करून तब्बल ३२ तासांनंतर वाहतूक सुरू झाली असतानाच, लोणावळ्याजवळ सिमेंट वाहून नेणारा कंटेनर रस्त्यातच बंद पडल्याने पुन्हा एकदा भीषण वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. यामुळे मुंबईच्या दिशेने जाणारी वाहतूक मोठ्या प्रमाणात मंदावली असून, मागील २० ते २२ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, लोणावळा परिसरात सिमेंटचा कंटेनर तांत्रिक बिघाडामुळे अचानक बंद पडला. त्यामुळे द्रुतगती मार्गावरील एक लेन पूर्णतः ठप्प झाली. परिणामी, आधीच घाटातील कोंडीतून बाहेर पडलेली वाहतूक पुन्हा अडकली. महामार्ग पोलीस आणि आयआरबीची पथके तातडीने घटनास्थळी दाखल झाली असून, क्रेनच्या सहाय्याने कंटेनर बाजूला करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. मात्र, वाहनांची संख्या प्रचंड असल्याने कोंडी कमी होण्यास वेळ लागत आहे.
वाहनातच रात्र काढण्याची वेळ
खंडाळा घाटातील दीर्घ खंडानंतर मंगळवारी रात्री उशिरा वाहतूक सुरू करण्यात आली होती. मात्र, अचानक निर्माण झालेल्या कोंडीमुळे अनेक वाहनचालकांना रस्त्यातच ताटकळत राहावे लागले. काही ठिकाणी परिस्थिती इतकी बिकट झाली की चालकांनी वाहनातच मुक्काम केला. बुधवारी सकाळी वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलिसांना झोपेतून वाहनचालकांना उठवून गाड्या पुढे नेण्याचे आवाहन करावे लागले.
सध्या लोणावळ्यापासून सुमारे २० किलोमीटर आधीपासून वाहने अडकून पडली असून, गेल्या दोन तासांत काही वाहनांनी केवळ दोन किलोमीटरचे अंतर कापल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. मावळ परिसरातून द्रुतगती मार्गावर येणाऱ्या प्रवाशांना या कोंडीचा मोठा फटका बसत आहे. लोणावळ्याजवळ अद्यापही ५ ते १० किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा कायम आहेत.
दीड लाख वाहनांचा खोळंबा
३ फेब्रुवारीपासून मुंबई–पुणे द्रुतगती मार्गावर सुमारे २५ किलोमीटरपर्यंत तब्बल दीड लाख वाहने अडकली होती. अन्न, पाणी आणि मूलभूत सुविधांचा अभाव यामुळे प्रवाशांचे मोठे हाल झाले. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन प्रशासनाने काही काळ मुंबईच्या दिशेने जाणारी वाहतूक बंद केली होती. तसेच, बुधवारी सकाळपासून टोल वसुलीही तात्पुरती थांबवण्यात आली.
या कोंडीचा मोठा परिणाम एसटी महामंडळावरही झाला आहे. विविध विभागांतील १६३ हून अधिक बसेस अडकून पडल्या होत्या. परिणामी, ई-शिवनेरीसह १३९ बस फेऱ्या रद्द कराव्या लागल्याची माहिती एसटी प्रशासनाकडून देण्यात आली.
खंडाळा आणि लोणावळा परिसरात वारंवार उद्भवणाऱ्या अशा घटनांमुळे द्रुतगती मार्गावरील वाहतूक व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.


