मुंबई प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातातील दुर्दैवी निधनानंतर निर्माण झालेली राजकीय पोकळी अखेर शनिवारी भरून निघाली. सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली असून, त्या महाराष्ट्राच्या इतिहासातील पहिल्या महिला उपमुख्यमंत्री ठरल्या आहेत. राजभवनातील लोकभवन येथे कोणताही गाजावाजा न करता पार पडलेल्या या शपथविधीने राज्याच्या राजकारणात नवा अध्याय सुरू झाला आहे.
शनिवारी दुपारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधीमंडळ पक्षाच्या बैठकीत सुनेत्रा पवार यांची पक्षनेतेपदी निवड करण्यात आली. त्यानंतर सायंकाळी पाच वाजता राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी त्यांना उपमुख्यमंत्रीपदाची शपथ दिली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, तसेच मंत्रिमंडळातील वरिष्ठ मंत्री उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल यांच्यासह भाजप व शिवसेनेचे प्रमुख नेतेही या सोहळ्याला उपस्थित होते.
अजित पवार यांच्या निधनानंतर अवघ्या काही दिवसांत सत्ता-संरचनेतील हा निर्णय घेण्यात आल्याने राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. शपथविधी अत्यंत साध्या वातावरणात पार पडला असला, तरी उपस्थित समर्थकांकडून ‘अजित पवार अमर रहे’च्या घोषणा दिल्या जात होत्या. त्यामुळे या शपथविधीला भावनिक छटा लाभली.
दरम्यान, खातेवाटपाबाबत अद्याप कोणताही निर्णय जाहीर करण्यात आलेला नाही. उपमुख्यमंत्रीपदासोबत सुनेत्रा पवार यांच्याकडे कोणती महत्त्वाची खाती सोपवली जाणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. येत्या काही दिवसांत याबाबत अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे.
या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर पवार कुटुंबातील मतभेदही प्रकर्षाने समोर आले. शनिवारी सकाळी झालेल्या पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी शपथविधीबाबत आपल्याला कोणतीही माहिती नसल्याचे स्पष्ट केले. हा पक्षाचा अंतर्गत निर्णय असल्याचे सांगत त्यांनी या प्रक्रियेत स्वतःला बाजूला ठेवले असल्याचे संकेत दिले.
यानंतर पार्थ पवार यांनी शरद पवार यांची भेट घेऊन शपथविधीचे निमंत्रण दिल्याचे सांगण्यात आले. मात्र शरद पवार शपथविधीस उपस्थित राहिले नाहीत. दुसरीकडे, खासदार सुप्रिया सुळे यांनी बारामती तालुक्यातील काटेवाडी येथे जाऊन अजित पवार यांच्या मातांची भेट घेतली. मुंबईत सत्ता-संक्रमणाचा सोहळा सुरू असतानाच बारामतीत मात्र शोकाकूल वातावरण पाहायला मिळाले.
अल्पावधीत घडलेल्या या राजकीय घडामोडींमुळे राज्याच्या राजकारणात नवी समीकरणे आकाराला येत असल्याचे स्पष्ट होत आहे. सुनेत्रा पवार यांच्या नियुक्तीमुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नेतृत्वाचा प्रश्न तात्पुरता सुटला असला, तरी आगामी काळात पक्षातील अंतर्गत राजकारण आणि सत्तेतील समन्वय कसा साधला जाणार, याकडे सर्वांचे लक्ष राहणार आहे.


