मुंबई प्रतिनिधी
रविवारी घराबाहेर पडणाऱ्या प्रवाशांना मेगाब्लॉकचा फटका बसण्याची शक्यता असून, प्रवासापूर्वी लोकलचे वेळापत्रक तपासण्याचे आवाहन मध्य रेल्वेकडून करण्यात आले आहे. रविवार, १ फेब्रुवारी २०२६ रोजी मध्य रेल्वेच्या उपनगरीय मार्गावर अभियांत्रिकी व देखभाल-दुरुस्ती कामांसाठी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे लोकल सेवांमध्ये बदल व विलंब संभवतो.
मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात ठाणे ते कल्याण स्थानकांदरम्यान अप व डाऊन जलद मार्गावर सकाळी १०.४० ते दुपारी ३.४० या कालावधीत मेगाब्लॉक राहणार आहे. या काळात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई येथून सकाळी ९.३४ ते दुपारी ३.०३ दरम्यान सुटणाऱ्या डाऊन जलद व अर्धजलद लोकल फेऱ्या ठाणे ते कल्याण दरम्यान डाऊन धीम्या मार्गावरून वळविण्यात येणार आहेत. या फेऱ्या कळवा, मुंब्रा व दिवा स्थानकांवर अतिरिक्त थांबे घेतील आणि सुमारे दहा मिनिटे उशिराने पोहोचतील.
तसेच, कल्याण येथून सकाळी १०.२८ ते दुपारी ३.४० या वेळेत सुटणाऱ्या अप जलद व अर्धजलद लोकल फेऱ्या कल्याण ते ठाणे दरम्यान अप धीम्या मार्गावरून चालविण्यात येतील. या लोकल फेऱ्या दिवा, मुंब्रा व कळवा स्थानकांवर थांबतील आणि पुढे मुलुंड स्थानकात पुन्हा अप जलद मार्गावर वळविण्यात येतील. याही फेऱ्यांना सुमारे दहा मिनिटांचा विलंब होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई व दादर येथून सुटणाऱ्या डाऊन मेल-एक्सप्रेस गाड्या ठाणे ते कल्याण दरम्यान पाचव्या मार्गिकेवरून वळविण्यात येणार आहेत. तसेच, मुंबईकडे येणाऱ्या अप मेल-एक्सप्रेस गाड्या कल्याण ते ठाणे-विक्रोळी दरम्यान सहाव्या मार्गावरून धावतील.
हार्बर मार्गावरही प्रवाशांना बदलांचा सामना करावा लागणार आहे. कुर्ला ते वाशी स्थानकांदरम्यान अप व डाऊन मार्गावर सकाळी ११.१० ते दुपारी ४.१० या वेळेत ब्लॉक राहणार आहे. या कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई येथून सकाळी १०.३४ ते दुपारी ३.३६ दरम्यान वाशी-बेलापूर-पनवेलकडे जाणाऱ्या डाऊन हार्बर लोकल फेऱ्या तसेच पनवेल-बेलापूर-वाशी येथून सकाळी १०.१७ ते दुपारी ३.४७ दरम्यान मुंबईकडे येणाऱ्या अप हार्बर लोकल फेऱ्या रद्द राहणार आहेत.
ब्लॉक कालावधीत प्रवाशांच्या सोयीसाठी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-कुर्ला तसेच पनवेल-वाशी दरम्यान विशेष उपनगरीय लोकल फेऱ्या चालविण्यात येणार आहेत. तसेच, हार्बर मार्गावरील प्रवाशांना सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत ठाणे-वाशी व नेरूळ स्थानकांदरम्यान प्रवास करण्याची विशेष अनुमती देण्यात आली आहे.
मेगाब्लॉकमुळे प्रवासात अडचणी येऊ शकतात, त्यामुळे प्रवाशांनी वेळापत्रक पाहूनच घराबाहेर पडावे, असे आवाहन मध्य रेल्वे प्रशासनाने केले आहे.


