मुंबई प्रतिनिधी
मध्य रेल्वेच्या सायन रेल्वे स्थानकाजवळ शुक्रवारी सकाळी लोकल ट्रेनमध्ये झालेल्या वादाचे रूपांतर झटापटीत होऊन तीन प्रवासी थेट रेल्वे रुळावर पडल्याची घटना घडली. यामध्ये एका प्रवाशाची प्रकृती गंभीर असून, उर्वरित दोघांवर उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, हे तिघे कुर्ला स्थानकावरून सकाळी सुमारे ९.४० वाजताच्या सुमारास कल्याण–सीएसएमटी धीम्या लोकलमध्ये चढले होते. प्रवासादरम्यान त्यांच्यात वाद झाला. हा वाद वाढत झटापटीत रूपांतरित झाला आणि त्याचवेळी सायन स्थानकादरम्यान हे तिघे लोकलमधून खाली पडले. ही घटना सुमारे १०.४३ वाजण्याच्या सुमारास घडल्याची नोंद आहे.
घटनेनंतर संभाव्य जीवितहानी टाळण्यासाठी रेल्वे प्रशासनाने तातडीने ओव्हरहेड वायरचा विद्युतपुरवठा सुमारे नऊ मिनिटांसाठी बंद केला. त्यामुळे अप व डाऊन धीम्या मार्गावरील लोकल सेवा काही काळ ठप्प झाली. जखमी प्रवाशांना तत्काळ सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले.
यामध्ये अफझल चौधरी (३६, गोवंडी) यांची प्रकृती गंभीर असून, सचिन विश्वकर्मा (२१, नालासोपारा) आणि जैनिल सय्यद (२५, कुर्ला) यांच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली.
प्रवाशांचे हाल
सकाळच्या गर्दीच्या वेळी लोकल सेवा खोळंबल्याने प्रवाशांचे हाल झाले. काही प्रवाशांना डब्यांमध्येच थांबावे लागले, तर स्थानकांवरही मोठी गर्दी झाली. जखमींना तातडीने वैद्यकीय मदत मिळावी, यासाठी विद्युतपुरवठा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले.
नेमके कारण अस्पष्ट
सायन स्थानकादरम्यान प्रवासी नेमके कशामुळे खाली पडले, याचा तपास रेल्वे पोलिसांकडून सुरू आहे. गर्दीच्या रेट्यामुळे तोल जाऊन ही घटना घडली की डब्यातील भांडणातून झटापट होऊन प्रवासी पडले, याबाबत वेगवेगळे दावे करण्यात येत आहेत. मात्र, पोलिसांच्या तपासानंतरच नेमके कारण स्पष्ट होणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.


