बारामती प्रतिनिधी
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनाने बारामतीसह संपूर्ण महाराष्ट्रात शोककळा पसरली आहे. बुधवारी सकाळी मुंबईहून बारामतीकडे येत असताना त्यांच्या खासगी विमानाला लँडिंगदरम्यान अपघात झाला. या दुर्घटनेत अजित पवारांसह विमानातील पाचही जणांचा मृत्यू झाला. या धक्कादायक घटनेनंतर विद्या प्रतिष्ठानच्या मैदानात पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. गुरुवारी याच ठिकाणी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. हजारोंच्या संख्येने उपस्थित असलेल्या जनसागरात शोक, अस्वस्थता आणि कृतज्ञतेची भावना स्पष्टपणे जाणवत होती.
#बारामती
दादांचे कार्यकर्त्यांना कसे वेड लावले होते याचे हे उदाहरण आहे. बार्शीतील कार्यकर्त्यांने स्वतःच्या रक्ताने काढलेले हे चित्र.
आज बारामतीत प्रत्येक जण म्हणतोय आता आमच काय होणार ? आमचे भविष्य काय?
याचं उत्तर आत्ता कोणीकडेच नाही#अजितपवार #AjitPawar #AjitPawarPlaneCrash pic.twitter.com/fLPyuk1IJp— Brijmohan Patil (@brizpatil) January 29, 2026
या शोकसभेत अनेक भावनिक क्षण अनुभवायला मिळाले. मात्र, त्यात विशेष लक्ष वेधून घेतले ते एका छायाचित्राने – अजित पवार यांचे स्वतःच्या रक्ताने काढलेले चित्र. बार्शी येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका कार्यकर्त्याने काढलेले हे चित्र अंत्यसंस्कारस्थळी आणण्यात आले होते. सामाजिक माध्यमांवर हे छायाचित्र झपाट्याने व्हायरल झाले असून, कार्यकर्त्यांच्या भावविश्वातील अस्वस्थता आणि नेत्यावरील निष्ठेचे ते प्रतीक ठरले आहे.
ब्रिजमोहन पाटील यांनी या छायाचित्रासह केलेल्या पोस्टमध्ये, “दादांचे कार्यकर्त्यांवर असलेले प्रेम आणि कार्यकर्त्यांची दादांवरील श्रद्धा याचे हे बोलके उदाहरण आहे. आज बारामतीत प्रत्येकाच्या ओठांवर एकच प्रश्न आहे-‘आता आमचं काय?’” अशी भावना व्यक्त केली आहे. नेतृत्व हरवल्याची जाणीव, भविष्याबाबतची अनिश्चितता आणि भावनिक पोकळी या साऱ्यांचे प्रतिबिंब या शब्दांत दिसते.

अजित पवार हे त्यांच्या रोखठोक शैलीसाठी, कामाच्या प्रचंड उरकासाठी आणि निर्णयक्षमतासाठी ओळखले जात. प्रशासकीय शिस्त, वेळेची काटेकोरता आणि थेट संवाद हे त्यांच्या नेतृत्वाचे वैशिष्ट्य होते. त्यांच्या जाण्याने राज्याने एक दिलखुलास, प्रांजळ आणि प्रभावी नेता गमावल्याची भावना केवळ समर्थकांपुरती मर्यादित राहिलेली नाही.
सकाळी सुमारे ८.४५ वाजता घडलेल्या या अपघाताने महाराष्ट्राला हादरवले. अकाली घेतलेल्या या एक्झिटने राजकीय पटलावर पोकळी निर्माण झाली असून, शोकांतिकेच्या सावलीत अनेक प्रश्न अनुत्तरित राहिले आहेत. रक्तातून उमटलेली ही श्रद्धांजली मात्र, अजित पवार यांच्यावरील निस्सीम निष्ठा आणि त्यांच्या कार्यकर्त्यांशी असलेले भावबंध अधोरेखित करून जाते.


