
बारामती प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील 54 वर्षीय शिक्षक हनीट्रॅपच्या जाळ्यात सापडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शिक्षकाला नग्न व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत तब्बल १ लाख १५ हजार ३५० रुपये उकळल्याचा आरोप असून, वडगाव निंबाळकर पोलिसांनी दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे अभिषेक विठ्ठल पांचाळ (रा. चाकण, मूळ रा. उदगीर, जि. लातूर) आणि सिद्धांत माधव गगनभिडे (रा. चाकण, मूळ रा. पाटोदा बुद्रूक, जि. लातूर) अशी आहेत.
काय घडलं नेमकं?
मे २०२५ मध्ये पीडित शिक्षकाला एका महिलेच्या नावाने फेसबुकवरून फ्रेंड रिक्वेस्ट आली. त्यानंतर चॅटिंग आणि इन्स्टाग्रामवर संपर्क वाढत गेला. काही दिवसांतच त्या खात्यावरून नग्नावस्थेतील महिलेने व्हिडिओ कॉल केला. त्यावेळी शिक्षकाला कपडे काढण्यास भाग पाडण्यात आले. नकार दिल्यावर चॅटिंगचे स्क्रीनशॉट व व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देण्यात आली.
यानंतर अभिषेक पांचाळ याने शिक्षकाला फोन करून त्यांचे नग्न फोटो आणि व्हिडिओ व्हॉट्सअॅपवर पाठवले. दोन लाख रुपये द्यावे, अन्यथा व्हिडिओ व्हायरल करून नोकरी गमवावी लागेल तसेच जीवे मारू, अशी धमकी देण्यात आली.
भीतीपोटी शिक्षकाने काही रक्कम पाठवली. सिद्धांत गगनभिडेच्या फोनपे खात्यावर ३० हजार रुपये आणि ७ जुलैला ७० हजार रुपये आरोपींनी घेतले. एवढ्यावर न थांबता २९ ऑगस्टला पुन्हा एक लाखाची मागणी करत गावात जाऊन शिक्षकाला धमकावण्यात आले. अखेर शिक्षकाने हा प्रकार पुतण्याला सांगितल्यानंतर पोलिसांत धाव घेतली.
सध्या वडगाव निंबाळकर पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.