बारामती प्रतिनिधी
राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या विमान अपघातात झालेल्या दुर्दैवी निधनानंतर बारामती येथे पार पडलेल्या अंत्यसंस्कार सोहळ्यात शोकाकुल वातावरण असतानाच भामट्यांनी गर्दीचा गैरफायदा घेत मोठी चोरी केल्याची गंभीर घटना उघडकीस आली आहे. अंत्ययात्रेसाठी राज्यभरातून आलेल्या नागरिक, कार्यकर्ते, महिला भगिनी आणि नेत्यांच्या प्रचंड गर्दीत काही अज्ञात चोरट्यांनी सोन्याच्या साखळ्या व रोख रक्कम लंपास केल्याचे तपासात समोर आले आहे. या प्रकरणात सुमारे २० लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
दि. २९ रोजी झालेल्या अंत्यसंस्काराच्या वेळी हजारोंच्या संख्येने उपस्थित असलेल्या नागरिकांमध्ये शोक आणि भावनिक तणावाचे वातावरण होते. याच संधीचा फायदा घेत चोरट्यांनी गर्दीत मिसळून नागरिकांच्या गळ्यातील सोन्याच्या साखळ्या हिसकावल्या तसेच रोख रक्कम चोरली. घटनेनंतर पीडितांनी दिलेल्या तक्रारीनुसार बारामती तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
तपासात फिर्यादी रणजीत बाळासाहेब जाधव यांच्यासह साक्षीदार विश्वजीत अनिल तुपे, अंकुश शांताराम दिघे, प्रशांत लक्ष्मण सपकाळ, विकास कैलास भागवत, रणजीत मधुकर भोंगळे आदींच्या गळ्यातील सोन्याच्या साखळ्या व रोख रक्कम चोरीस गेल्याचे स्पष्ट झाले आहे. एकूण नुकसान सुमारे २० लाख रुपयांच्या आसपास असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.
गुन्हा दाखल होताच बारामती पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे तपासाची चक्रे वेगाने फिरवली. तपासादरम्यान राजकुमार बाबुराव आठवले (रा. तलवाडा, ता. गेवराई, जि. बीड), मोहम्मद अनीस मोहम्मद युनूस, एजाज भगु मीरावले, मोहम्मद सादिक मोहम्मद गफार (सर्व रा. गवळीपुरा/मोतीनगर, डिग्रज, जि. यवतमाळ), बाळू उर्फ दत्तात्रय बबन धोत्रे (मूळ रा. पाथर्डी, जि. अहिल्यानगर; सध्या पळसदेव, ता. इंदापूर, जि. पुणे), तुषार कैलास मासाळ (रा. कोरडगाव, ता. शेवगाव, जि. अहिल्यानगर) आणि नितीन अंकुश गायकवाड (रा. शिक्षक कॉलनी, जि. बीड) या सात आरोपींना अटक करण्यात आली.
आरोपींकडून चोरीस गेलेला सोन्याचा मुद्देमाल आणि रोख रक्कम हस्तगत करण्यासाठी पुढील तपास सुरू असून, त्यांची कसून चौकशी करण्यात येत आहे. शोकसभेसारख्या संवेदनशील प्रसंगी घडलेल्या या प्रकारामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत असून, अशा गर्दीच्या कार्यक्रमांतील सुरक्षेच्या उपाययोजनांबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.


