मुंबई प्रतिनिधी
राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाने केवळ एक राजकीय नेतृत्वच नव्हे, तर प्रशासनाशी घट्ट नाळ जोडलेला, कामाच्या काटेकोर शिस्तीवर विश्वास ठेवणारा लोकनेता राज्य शासनाने गमावला आहे, अशी भावना मंत्रालयात व्यक्त झाली. मंत्रालयाच्या त्रिमूर्ती प्रांगणात आयोजित शोकसभेत अधिकारी-कर्मचारी गहिवरलेल्या मनाने अजित पवार यांना श्रद्धांजली वाहत होते.
आपल्या प्रदीर्घ सार्वजनिक आयुष्यात अजित पवार यांनी प्रामाणिकपणा, निष्ठा आणि कर्तव्यभावनेला सर्वोच्च स्थान दिले. वेळेचे काटेकोर नियोजन, निर्णयक्षम नेतृत्व आणि कामाबाबत कोणतीही तडजोड न करणारी भूमिका, हीच त्यांची ओळख होती, असे प्रतिपादन अपर मुख्य सचिव विकास खारगे यांनी शोकसभेत केले. त्यांच्या निधनाने राज्य शासनाने एक कर्तव्यदक्ष, शिस्तबद्ध आणि वक्तशीर नेतृत्व गमावले असल्याची भावना उपस्थित सर्वांच्या वतीने त्यांनी व्यक्त केली.
यावेळी मंत्रालयातील वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी डॉ. इकबालसिंह चहल, मनीषा म्हैसकर, अश्विनी भिडे, असिम कुमार गुप्ता, विकासचंद्र रस्तोगी, वेणुगोपाल रेड्डी, अनुपकुमार सिंग, राधिका रस्तोगी, एकनाथ डवले, सौरभ विजय, डॉ. हर्षदीप कांबळे, अतुल पाटणे, संजय खंदारे, एस. चोक्कलिंगम, रणजितसिंह देओल, वीरेंद्र सिंह, गणेश पाटील, संतोष कुमार, दिलीप घुमरे, जयश्री भोज, अंशु सिन्हा, राजेश गवांदे, विजय वाघमारे, मकरंद देशमुख यांच्यासह मोठ्या संख्येने अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. सर्वांनी दिवंगत अजित पवार यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली. दोन मिनिटांचे मौन पाळून त्यांच्या कुटुंबीयांप्रती सहवेदना व्यक्त करण्यात आल्या.
राजकारणात कठोर, पण निर्णयक्षम; प्रशासनात शिस्तप्रिय, पण संवेदनशील; आणि कार्यकर्त्यांसाठी कायम उपलब्ध असलेले नेतृत्व म्हणून अजित पवारांची ओळख होती. त्यांच्या जाण्याने निर्माण झालेली ही पोकळी केवळ राजकीय नव्हे, तर भावनिक पातळीवरही राज्याला दीर्घकाळ जाणवणार आहे.


