मुंबई प्रतिनिधी
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आकस्मिक निधनानंतर राज्यभर तीन दिवसांचा शासकीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाने १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या उर्वरित कार्यक्रमात महत्त्वाचे बदल जाहीर केले आहेत. यानुसार, यापूर्वी ५ फेब्रुवारी २०२६ रोजी होणारे मतदान आता दोन दिवसांनी पुढे ढकलून ७ फेब्रुवारी २०२६ रोजी घेण्यात येणार आहे.
राज्य निवडणूक आयोगाने १३ जानेवारी २०२६ रोजी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांचा मूळ कार्यक्रम जाहीर केला होता. त्यानुसार उमेदवारी अर्ज भरणे, अर्ज छाननी, माघार घेणे तसेच निवडणूक चिन्हांचे वाटप या सर्व प्रक्रिया निर्धारित वेळेत पूर्ण झाल्या आहेत. मात्र, २८ जानेवारी रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अपघाती निधन झाल्याने २८ ते ३० जानेवारी या कालावधीत राज्यात शासकीय दुखवटा पाळण्यात येत आहे. या परिस्थितीचा विचार करून निवडणूक प्रक्रियेत आवश्यक ते बदल करण्याचा निर्णय आयोगाने घेतला.
दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने या निवडणुकांसाठी ३१ जानेवारीनंतर केवळ दोन आठवड्यांची मुदतवाढ देण्यास मान्यता दिली होती. तरीही, शासकीय दुखवटा आणि एकूण प्रशासकीय परिस्थिती लक्षात घेता आयोगाने मतदानाच्या तारखेत दोन दिवसांचा बदल करण्याचा निर्णय घेतल्याचे अधिकृत सूत्रांनी स्पष्ट केले.
प्रचारासाठी अतिरिक्त वेळ
निवडणूक कार्यक्रमात बदल झाल्याने उमेदवारांना प्रचारासाठी अतिरिक्त वेळ मिळणार आहे. सुधारित वेळापत्रकानुसार, जाहीर प्रचाराची मुदत आता ५ फेब्रुवारीच्या रात्री १० वाजेपर्यंत असणार आहे. त्यामुळे उमेदवारांना मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी आणखी दोन दिवसांचा अवधी उपलब्ध होणार आहे.
मतमोजणी ९ फेब्रुवारीला
सुधारित कार्यक्रमानुसार ७ फेब्रुवारी रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत मतदान होणार आहे. त्यानंतर ९ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी १० वाजल्यापासून मतमोजणी प्रक्रिया राबवली जाईल. निकाल जाहीर होताच संबंधित निवडणूक क्षेत्रातील आदर्श आचारसंहिता संपुष्टात येईल.
या सुधारित कार्यक्रमाची अधिकृत अधिसूचना संबंधित जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी ३१ जानेवारी २०२६ रोजी प्रसिद्ध करणार असल्याचे राज्य निवडणूक आयोगाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
सुधारित वेळापत्रक असे –
प्रचार समाप्ती : ३ फेब्रुवारी ५ फेब्रुवारी (रात्री १० वाजेपर्यंत)
मतदान : ५ फेब्रुवारी ७ फेब्रुवारी (सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३०)
मतमोजणी : ७ फेब्रुवारी ९ फेब्रुवारी (सकाळी १० वाजल्यापासून)
राजपत्रात प्रसिद्धी : ११ फेब्रुवारी २०२६ पर्यंत
उपमुख्यमंत्र्यांच्या निधनामुळे निर्माण झालेल्या शोकांतिक वातावरणात लोकशाही प्रक्रिया सन्मानपूर्वक आणि सुरळीत पार पडावी, यासाठी हा बदल करण्यात आल्याचे आयोगाने नमूद केले आहे.


