मुंबई प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनामुळे रिक्त झालेल्या पदावर त्यांच्या पत्नी सूनेत्रा पवार यांची शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड केली जाणार आहे. त्यानंतर लगेचच त्यांचा उपमुख्यमंत्रीपदाचा शपथविधी पार पडण्याची शक्यता असून, हा सोहळा अत्यंत साधेपणाने होईल, अशी माहिती पक्षातील सूत्रांनी दिली.
यासंदर्भात शनिवारी दुपारी राष्ट्रवादी काँग्रेस विधिमंडळ पक्षाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत सूनेत्रा पवार यांची एकमताने विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड केली जाईल, असा पक्षातील वरिष्ठांचा विश्वास आहे. बैठकीनंतर लगेचच निवडीचे पत्र मुख्यमंत्र्यांकडे सादर करण्यात येणार असून, राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या वेळापत्रकानुसार त्यांचा शपथविधी पार पडेल.
दरम्यान, शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ आणि सुनील तटकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी भेट घेतली. या भेटीत पक्षाच्या वतीने सूनेत्रा पवार यांची विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड केली जाणार असल्याची औपचारिक माहिती मुख्यमंत्र्यांना देण्यात आली. पक्षातील सूत्रांनुसार, ही निवड प्रक्रिया जलदगतीने पूर्ण करून सरकारमधील रिक्त जागा तात्काळ भरून काढण्यावर भर देण्यात आला आहे.
सूनेत्रा पवार यांचा राज्य मंत्रिमंडळात तत्काळ समावेश करण्यात येणार असून, अजित पवार यांच्याकडे असलेली महत्त्वाची वित्त व नियोजन तसेच उत्पादन शुल्क ही खाती पक्षाकडेच कायम राहावीत, अशी अपेक्षा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने मुख्यमंत्र्यांकडे व्यक्त करण्यात आली आहे.
पुण्याचे पालकत्व कोणाकडे?
अजित पवार यांच्या निधनानंतर पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाबाबतही चर्चांना वेग आला आहे. पुण्याचे पालकत्व कोणाकडे सोपवले जाणार, याबाबत अद्याप निर्णय जाहीर झालेला नसला तरी, यासंदर्भात लवकरच निर्णय होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. सरकार आणि पक्ष पातळीवर याबाबत सध्या विचारमंथन सुरू असल्याचे समजते.
एकूणच, सूनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस सरकारमधील आपली भूमिका सातत्याने कायम ठेवण्याचा प्रयत्न करणार असून, शनिवारी होणाऱ्या घडामोडींवर राज्याचे राजकीय लक्ष केंद्रित झाले आहे.


