मुंबई प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनाने राज्याच्या राजकारणात आणि समाजजीवनात तीव्र शोककळा पसरली आहे. मुंबईहून बारामतीकडे प्रवास करत असताना त्यांचे खासगी विमान बारामती विमानतळाजवळ कोसळले. या दुर्घटनेत अजित पवार यांच्यासह पाच जणांचा मृत्यू झाला.
अपघातानंतर काही क्षणांतच विमानाला भीषण आग लागली आणि मोठा स्फोट झाल्याची माहिती समोर आली. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली. लोकप्रिय आणि प्रभावी नेते म्हणून ओळख असलेल्या अजित पवार यांच्या अकाली निधनाने समर्थकांसह सर्वसामान्य नागरिकांत हळहळ व्यक्त होत आहे.
DCM Ajit pawar plane ✈️ crash is doubtful Need to be inquired by high court judge and human right commission , whether plane was deliberately kept defective or there was any technical fault or any political conspiracy ? Need to be investigated by CBI
…. Adv Nitin Satpute— Adv Nitin Satputeअॅड नितीन सातपुतेએડ નિતિન સાતપુતે (@Nitin_Satpute) January 28, 2026
दरम्यान, या अपघाताबाबत वकील नितीन सातपुते यांनी गंभीर संशय व्यक्त केल्याने चर्चेला नवे वळण मिळाले आहे. त्यांनी या दुर्घटनेची स्वतंत्र आणि उच्चस्तरीय चौकशी व्हावी, अशी मागणी केली आहे.
‘अपघात की षडयंत्र?’- चौकशीची मागणी
वकील नितीन सातपुते यांनी निवेदनात म्हटले आहे की, “अजित पवार यांचा विमान अपघात केवळ तांत्रिक बिघाडामुळे झाला, याबाबत निश्चित निष्कर्ष काढण्याआधी सखोल चौकशी आवश्यक आहे. विमानात काही तांत्रिक त्रुटी होत्या का, देखभाल योग्यरीत्या करण्यात आली होती का, अथवा जाणीवपूर्वक निष्काळजीपणा किंवा षडयंत्र होते का या सर्व शक्यता तपासल्या पाहिजेत.”
या प्रकरणाची चौकशी उच्च न्यायालयाचे न्यायाधीश, मानवी हक्क आयोग तसेच केंद्रीय अन्वेषण विभागाकडून (सीबीआय) करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
अपघात नेमका कसा घडला?
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी अजित पवार सकाळी ८.१० वाजता मुंबईहून बारामतीकडे रवाना झाले होते. साधारण ४० मिनिटांच्या प्रवासानंतर विमान बारामती विमानतळाच्या हद्दीत आले. मात्र लँडिंगच्या अखेरच्या टप्प्यात अचानक तांत्रिक अडथळा निर्माण झाल्याचे सांगितले जात आहे.
पायलटने परिस्थिती सावरून सुरक्षित लँडिंगचा प्रयत्न केला, मात्र तो यशस्वी ठरला नाही. धावपट्टीपासून काही अंतरावर विमान कोसळले आणि त्यानंतर मोठा स्फोट झाला.
प्रत्यक्षदर्शींची माहिती
अपघातस्थळी उपस्थित असलेल्या एका महिला प्रत्यक्षदर्शीने सांगितले, “विमान एकदा वरून गेले, नंतर खाली येताना दिसले. काही क्षणांत ते वळले आणि थेट जमिनीवर कोसळले. त्यानंतर जोरदार स्फोट झाला. स्फोटामुळे विमानाचे तुकडे आसपासच्या घरांपर्यंत उडाले.”
विमानात कोण होते?
अपघातग्रस्त विमानात एकूण पाच जण प्रवास करत होते. त्यामध्ये
अजित पवार
विदीप जाधव (खासगी सुरक्षारक्षक)
सुमित कपूर (पायलट कॅप्टन)
संभवी पाठक (को-पायलट)
पिंकी माळी (फ्लाइट अटेंडंट)
यांचा समावेश होता. सर्वांचा जागीच मृत्यू झाल्याचे अधिकृत सूत्रांकडून सांगण्यात आले.
अपघाताची चौकशी नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाकडून (DGCA) सुरू असून तांत्रिक अहवालानंतरच नेमके कारण स्पष्ट होईल, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. मात्र, संशय आणि आरोपांमुळे या प्रकरणाकडे राजकीय तसेच कायदेशीर दृष्टिकोनातून पाहिले जात असून येत्या काळात चौकशीचा आवाका वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.


