मुंबई प्रतिनिधी
बोरीवलीतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील (नॅशनल पार्क) आदिवासी बांधवांच्या घरांवर प्रस्तावित असलेली तोडकामाची कारवाई तात्काळ स्थगित करण्यात आली आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे वनमंत्री गणेश नाईक यांना लेखी निवेदन देण्यात आल्यानंतर महाराष्ट्र शासनाने हा निर्णय घेतला.
बोरीवली परिसरातील आदिवासी वस्तीवर वन विभागामार्फत घरे तोडण्याची कारवाई प्रस्तावित करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर स्थानिक आदिवासी बांधवांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला होता. त्यांच्या मागण्यांची दखल घेत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या शिष्टमंडळाने आज वनमंत्री गणेश नाईक यांची भेट घेऊन कारवाई स्थगित करण्याची मागणी केली.
या भेटीदरम्यान विभागप्रमुख उदेश पाटेकर, मुंबई विद्यापीठ सिनेट सदस्य व विधानसभा निरीक्षक शशिकांत झोरे, स्थानिक नगरसेविका सौ. सारिका शशिकांत झोरे, नगरसेवक धरम काळे, ॲड. संदेश नारकर, महेश मोरे, प्रशांत वरठे आणि विनायक मराठे उपस्थित होते.
शिष्टमंडळाने आदिवासींचे पुनर्वसन, त्यांचे पारंपरिक हक्क आणि सामाजिक प्रश्न यांचा सविस्तर आढावा मांडला. याची दखल घेत वनमंत्री गणेश नाईक यांनी तात्काळ निर्णय घेत महाराष्ट्र शासनातर्फे घरतोडीची कारवाई स्थगित करण्याचे आदेश वन विभागाला दिले.
या निर्णयामुळे बोरीवलीतील आदिवासी बांधवांना मोठा दिलासा मिळाला असून स्थानिक पातळीवर या निर्णयाचे स्वागत करण्यात येत आहे.


