मुंबई प्रतिनिधी
मुंबई शहर आणि उपनगरातील पोलीस कर्मचाऱ्यांसाठी ४० ते ४५ हजार सरकारी निवासस्थाने उपलब्ध करून देणाऱ्या महत्त्वाकांक्षी मुंबई पोलीस हाऊसिंग टाऊनशिप प्रकल्पाच्या अध्यक्षपदी मुंबईचे माजी महापालिका आयुक्त तथा ज्येष्ठ आयएएस अधिकारी इकबालसिंह चहल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या पदाला राज्यमंत्री दर्जा देण्यात आल्याने प्रशासकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
राज्य सरकारने गेल्या आठवड्यात या प्रकल्पाला मंजुरी दिली होती. त्यानंतर आता प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी अनुभवी अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली आहे. सध्या अतिरिक्त मुख्य सचिव (गृह) म्हणून कार्यरत असलेले चहल ३१ जानेवारी रोजी सेवानिवृत्त होणार असून, त्यानंतर ते या प्रकल्पाच्या अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारणार आहेत.
मुख्य सचिव पदाच्या शर्यतीत चहल यांचे नाव आघाडीवर होते. मात्र अखेर त्यांच्या सहकारी राजेश अग्रवाल यांची त्या पदावर निवड झाली. त्यानंतर चहल यांच्याकडे ही महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत मुंबई पोलीस हाऊसिंग टाऊनशिप प्रकल्प उभारण्यात येणार आहे. या अंतर्गत सुमारे ५ कोटी चौरस फूट क्षेत्राचा विकास करण्यात येणार असून, प्रकल्पाचा एकूण खर्च अंदाजे २० हजार कोटी रुपये अपेक्षित आहे. यापैकी ३० टक्के निधी राज्य सरकारकडून तर उर्वरित ७० टक्के निधी एमएसआयडीसीच्या माध्यमातून विविध वित्तीय संस्थांकडून कर्जरूपाने उभारण्यात येणार आहे. प्रकल्पाच्या प्रारंभासाठी महामंडळाला १०० कोटी रुपयांचा प्राथमिक निधी देण्यासही मंजुरी देण्यात आली आहे.
३६ वर्षांहून अधिक काळ प्रशासनातील विविध महत्त्वाच्या पदांवर कार्य केलेल्या चहल यांना प्रकल्प व्यवस्थापन, तसेच केंद्र व राज्यातील विविध यंत्रणांशी समन्वय साधण्याचा मोठा अनुभव आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली हा बहुप्रतीक्षित प्रकल्प गतीने मार्गी लागेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
निवृत्तीनंतरही राज्यासाठी महत्त्वाच्या प्रकल्पाची जबाबदारी स्वीकारणाऱ्या इकबालसिंह चहल यांच्या नियुक्तीकडे प्रशासनातील सातत्य आणि अनुभवाचा उपयोग म्हणून पाहिले जात आहे.


