मुंबई प्रतिनिधी
मुंबईकरांना पुढील काही दिवस मोठ्या पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे. २७ जानेवारीपासून ७ फेब्रुवारीपर्यंत मुंबई व पूर्व उपनगरांतील काही भागांत १० टक्के पाणीकपात लागू करण्यात येणार आहे. या कालावधीत मुंबई महानगरपालिकेच्या एकूण १२ वॉर्डांमध्ये पाणीपुरवठा कमी दाबाने होणार असून, याचा परिणाम सुमारे ५० टक्के लोकसंख्येवर होणार आहे.
ठाणे व भिवंडी महानगरपालिकेच्या अखत्यारीतील, मुंबई महानगरपालिकेकडून पाणीपुरवठा होणाऱ्या भागांनाही या कपातीचा फटका बसणार आहे. विशेष म्हणजे, एका आठवड्यात बीएमसीकडून पाणीकपात जाहीर होण्याची ही दुसरी वेळ आहे. यापूर्वी २० ते २२ जानेवारीदरम्यान शहरातील काही भागांत तब्बल ४४ तासांची पाणीकपात करण्यात आली होती.
पाणीकपातीमागील कारण काय?
बीएमसी अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, पिसे धरणातील न्यूमॅटिक (वायवीय) गेट सिस्टिमच्या आवश्यक देखभाल व दुरुस्ती कामांसाठी ही पाणीकपात लागू करण्यात येत आहे. ही प्रणाली धरणातील पाण्याची पातळी व प्रवाह नियंत्रित करण्याचे महत्त्वाचे काम करते. देखभालीदरम्यान पाण्याची गळती व अपव्यय टाळण्यासाठी पाणीपुरवठा पूर्ण क्षमतेने ठेवता येणार नसल्याने १० टक्के कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर पाणीपुरवठा टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात येणार असून, त्यामुळे काही काळ पाण्याचा दाब कमी राहण्याची शक्यता असल्याचेही अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. नागरिकांनी या काळात पाण्याचा वापर काटकसरीने करावा, असे आवाहन बीएमसीकडून करण्यात आले आहे.
मुंबईतील कोणत्या भागांत पाणीकपात?
मुंबई शहर विभाग
* ‘अ’ वॉर्ड – नेव्हल डॉकयार्ड परिसर
* ‘ब’ वॉर्ड – मोहम्मद अली मार्ग, डोंगरी
* ‘क’ वॉर्ड – भिंडी बाजार, बोहरी मोहल्ला, घोगरी मोहल्ला
* ‘ई’ वॉर्ड – भायखळा, मदनपुरा, आग्रीपाडा, डॉकयार्ड रोड, चिंचपोकळी, रे रोड
* ‘एफ’ दक्षिण वॉर्ड – परळ, लालबाग, हिंदमाता
* ‘एफ’ उत्तर वॉर्ड – माटुंगा, शिव, वडाळा, हिंदू कॉलनी
पूर्व उपनगर
* ‘टी’ वॉर्ड – मुलुंड (पूर्व व पश्चिम)
* ‘एस’ वॉर्ड – भांडुप, नाहूर, कांजूरमार्ग, विक्रोळी (पूर्व)
* ‘एन’ वॉर्ड – विक्रोळी, घाटकोपर (पूर्व)
* ‘एल’ वॉर्ड – कुर्ला (पूर्व)
* ‘एम’ पूर्व वॉर्ड – मानखुर्द, अनुशक्ती नगर, देवनार
* ‘एम’ पश्चिम वॉर्ड – चेंबूर, सिंधी कॉलनी, छेडा नगर, टिळक नगर
ठाणे शहरालाही फटका
न्यूमॅटिक गेट सिस्टिमच्या दुरुस्तीमुळे ठाणे शहरातील पाणीपुरवठ्यावरही परिणाम होणार आहे. ठाणे महानगरपालिकेला होणारा पाणीपुरवठा सुमारे २० टक्क्यांनी कमी होणार असून, पुढील १२ दिवस शहरात कमी दाबाने पाणीपुरवठा केला जाणार आहे. काही भागांत टप्प्याटप्प्याने पाणी वाटप करण्याची योजना आखण्यात आली आहे.
दरम्यान, पाणीकपातीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी पाण्याचा अपव्यय टाळून सहकार्य करावे, असे आवाहन बीएमसी व ठाणे महापालिकेकडून करण्यात आले आहे.


