मुंबई प्रतिनिधी
प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता पश्चिम रेल्वेने प्रजासत्ताक दिनापासून (२६ जानेवारी २०२६) काही महत्त्वाचे निर्णय जाहीर केले आहेत. याअंतर्गत मुंबई–अहमदाबाद वंदे भारत एक्सप्रेसची क्षमता वाढवण्यात आली असून, कर्णावती एक्सप्रेसच्या टर्मिनल स्थानकात तात्पुरता बदल करण्यात आला आहे.
प्रवाशांच्या वाढत्या मागणीला प्रतिसाद देत २२९६१/२२९६२ मुंबई सेंट्रल–अहमदाबाद वंदे भारत एक्सप्रेस आता १६ ऐवजी २० डब्यांसह धावणार आहे. हा बदल २६ जानेवारी ते ७ मार्च २०२६ या कालावधीत लागू राहणार आहे. या निर्णयामुळे प्रत्येक फेरीत सुमारे २७८ अतिरिक्त प्रवाशांना प्रवासाची संधी उपलब्ध होणार असून, प्रतीक्षा यादीचा ताण लक्षणीयरीत्या कमी होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, २६ जानेवारी ते ७ मार्च २०२६ या कालावधीत १२९३३/१२९३४ कर्णावती एक्सप्रेसच्या टर्मिनल स्थानकातही तात्पुरता बदल करण्यात आला आहे. ही गाडी आता मुंबई सेंट्रलऐवजी वांद्रे टर्मिनस (बीडीटीएस) येथून सुटणार आणि तेथेच पोहोचणार आहे.
नव्या वेळापत्रकानुसार, १२९३३ क्रमांकाची कर्णावती एक्सप्रेस वांद्रे टर्मिनस येथून दुपारी १.५५ वाजता सुटेल, तर परतीची १२९३४ क्रमांकाची गाडी दुपारी १२.३० वाजता वांद्रे टर्मिनस येथे पोहोचेल. बोरिवली ते अहमदाबाद/वटवा दरम्यानच्या स्थानकांवरील थांबे आणि वेळापत्रकात कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
पश्चिम रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना प्रवासापूर्वी या बदलांची नोंद घेण्याचे आवाहन केले आहे. तपशीलवार वेळापत्रक तसेच कोचची रचना जाणून घेण्यासाठी प्रवाशांनी enquiry.indianrail.gov.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी, असेही रेल्वेने स्पष्ट केले आहे.


