मुंबई प्रतिनिधी
महापालिका निवडणुकीसाठी अवघे काही दिवस उरले असताना मुंबईतील राजकीय वातावरण तापले आहे. शिवाजी पार्कवर महायुतीची प्रचारसभा पार पडली. या सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे बंधूंवर थेट आणि बोचऱ्या शब्दांत हल्लाबोल केला. ‘लाव रे तो व्हिडीओ’ या वक्तव्यावरून सुरू झालेल्या टीकेतून फडणवीसांनी ठाकरे बंधूंचा खरपूस समाचार घेत, त्यांच्या भूमिकांवर आणि आरोपांवर सवाल उपस्थित केले.
या सभेला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शिवसेना नेते रामदास कदम, केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्यासह महायुतीतील अनेक प्रमुख नेते उपस्थित होते. शिवाजी पार्कवरून बोलताना फडणवीस म्हणाले, “मुंबई महापालिकेवर महायुतीचा भगवा फडकवण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत. इतक्या सभा घेण्याची गरज नसते, माझ्यासाठी तर संवाद महत्त्वाचा असतो.”
ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात येऊन फडणवीसांनी थेट आव्हानात्मक भूमिका घेतली. ‘आता काही बोलायची गरज आहे का? त्यांनीच सगळं सांगून टाकलं आहे,’ असे म्हणत त्यांनी ठाकरे बंधूंवर टीका केली. “तुम्ही म्हणजे मराठी नाही, तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही, तुम्ही म्हणजे मुंबई नाही-हे सगळं इथे बसलेल्या जनतेचं आहे,” असे ते म्हणाले. यावेळी त्यांनी आदित्य ठाकरेंच्या भाषणशैलीची मिमिक्री करत टोला लगावला. “काकाच्या पक्षाची अवस्था पाहा, त्यांना नीट भाषण तरी करता येतं,” असे म्हणत त्यांनी आदित्य ठाकरेंची खिल्ली उडवली. “आदित्य ठाकरेंनी सांगावं, आमच्याकडून शीतल गंभीर येतील,” असे आव्हानही त्यांनी दिले.
मुंबई आणि महाराष्ट्र वेगळे करण्याच्या आरोपांवरून फडणवीसांनी विरोधकांवर कडाडून टीका केली. “कुणाच्या बापाचा, बापाचा, बापाचा बाप आला तरी मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करू शकत नाही,” असे ठामपणे सांगत त्यांनी विरोधकांचे आरोप फेटाळून लावले.
हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरूनही फडणवीसांनी ठाकरे बंधूंना लक्ष्य केले. “हे लोक गझनी आहेत,” अशी टीका करत त्यांनी अहवालाचा दाखला दिला. पहिली ते दहावीपर्यंत हिंदी सक्तीबाबत कुणी मान्यता दिली, याची प्रक्रिया सांगत “उद्धव ठाकरेंनीच हिंदी सक्ती केली होती,” असा दावा त्यांनी केला. यासंदर्भात आपल्याकडे पुरावे असल्याचेही फडणवीसांनी सांगितले.
याशिवाय, मुंबईतील पायाभूत सुविधांवर बोलताना त्यांनी विमानतळांच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधूंना टोला लगावला. “मुंबई विमानतळावर एकच रनवे असल्यामुळे नवी मुंबईत दुसरे विमानतळ उभारले. लवकरच तिसरे विमानतळही बांधले जाईल. लंडनमध्ये तीन विमानतळ असू शकतात, तर मुंबईत का नसावेत? इथेच तीन विमानतळ बांधली तर तुम्हाला लंडनला जाण्याची गरज पडणार नाही,” असे म्हणत त्यांनी मिश्किल पण राजकीय टोला लगावला.
महापालिका निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या सभेमुळे प्रचाराचा सूर अधिकच तीव्र झाला असून, शिवाजी पार्कवरील ही सभा महायुती–ठाकरे गटातील संघर्ष अधिक उघड करणारी ठरली आहे.


