मुंबई प्रतिनिधी
बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ पारदर्शक, शिस्तबद्ध आणि सुरळीत पार पडावी, यासाठी प्रशासनाने प्रथमच भौगोलिक कुंपण (जिओ-फेन्सिंग) प्रणाली वापरण्याचा निर्णय घेतला आहे. निवडणूक प्रक्रियेत सहभागी असलेल्या २,८६५ वाहनांच्या हालचालींवर थेट आणि सतत निगराणी ठेवली जाणार आहे.
महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्या निर्देशानुसार आणि अतिरिक्त आयुक्त (शहर) डॉ. (श्रीमती) अश्विनी जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली ही व्यवस्था राबविण्यात येत आहे. मतदान यंत्रे तसेच अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या ने-आणीसाठी बेस्टच्या १,०२३ बसेस, एसटीच्या १०१ बसेस, खासगी १,१६० बसेस आणि ५८१ टॅक्सी अशा एकूण २,८६५ वाहनांची नियुक्ती करण्यात आली आहे.
या सर्व वाहनांवर ट्रॅकिंग प्रणाली बसविण्यात आली असून ती थेट महापालिका मुख्यालयातील नियंत्रण कक्षाशी जोडलेली आहे. नियंत्रण कक्षातून वाहनांचे थेट स्थान निरीक्षण, मार्गक्रमणाचा इतिहास आणि जिओ-फेन्सिंग अलर्टवर लक्ष ठेवले जाणार आहे. नेमून दिलेल्या कार्यकक्षाच्या हद्दीबाहेर वाहन गेल्यास तात्काळ इशारा मिळणार असून त्यावरून त्वरित कारवाई शक्य होणार आहे.
या प्रणालीसाठी नियंत्रण कक्षात ३ अभियंते आणि ३ ऑपरेटर यांची ८-८ तासांच्या सत्रांनुसार नियुक्ती करण्यात आली आहे. तंत्रज्ञानाच्या साहाय्याने निवडणूक प्रक्रियेत शिस्त, पारदर्शकता आणि वेळेचे काटेकोर पालन सुनिश्चित करण्याचा हा उपक्रम महत्त्वाचा ठरणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.


