मुंबई प्रतिनिधी
रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेला अधिक बळकटी देण्यासाठी मध्य रेल्वेने महत्त्वाचा निर्णय घेतला असून, आता एक्स्प्रेस व मेल गाड्यांमधून प्रवास करण्यापूर्वी प्रवाशांच्या बॅगचे स्कॅनिंग आणि त्यावर रेल्वेचा विशिष्ट स्टिकर लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. ही प्रक्रिया पूर्ण न झाल्यास संबंधित प्रवाशांना ट्रेनमध्ये चढण्याची परवानगी दिली जाणार नाही, अशी स्पष्ट भूमिका रेल्वे प्रशासनाने घेतली आहे.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) हे मुंबईतील प्रमुख आणि अत्यंत वर्दळीचे टर्मिनस असून, येथून दररोज शेकडो मेल व एक्स्प्रेस गाड्या देशाच्या विविध भागांकडे रवाना होतात. मोठ्या प्रमाणावर प्रवासी ये-जा करत असल्याने सुरक्षिततेच्या दृष्टीने मध्य रेल्वेने येथे नव्या उपाययोजना अंमलात आणल्या आहेत.
रेल्वे प्रशासनाने काही दिवसांपूर्वी सीएसएमटीच्या मेल-एक्स्प्रेस गाड्यांच्या मुख्य प्रवेशद्वारांवर अत्याधुनिक बॅगेज स्कॅनर बसवले आहेत. या स्कॅनरद्वारे प्रवाशांचे सामान तपासल्यानंतरच त्यांना पुढे प्रवेश दिला जाणार आहे. याशिवाय लोकल प्लॅटफॉर्मवरून तसेच तिकीट काउंटरकडून एक्स्प्रेस प्लॅटफॉर्मकडे जाणाऱ्या सर्व प्रवेशद्वारांवर बॅरिकेट्स उभारण्यात आले असून, अनधिकृत प्रवेश रोखण्यावर भर देण्यात आला आहे.
तपासणी पूर्ण झाल्यानंतर प्रवाशांच्या बॅगेवर रेल्वेचा विशिष्ट प्रकारचा स्टिकर लावण्यात येणार आहे. हा स्टिकर म्हणजे संबंधित बॅगची सुरक्षा तपासणी झाली असल्याचा संकेत मानला जाणार आहे. ज्या प्रवाशांच्या बॅगेवर हा स्टिकर नसेल, त्यांना थेट ट्रेनमध्ये चढण्यास मज्जाव केला जाणार असल्याचे रेल्वे सूत्रांनी स्पष्ट केले आहे.
या नव्या व्यवस्थेमुळे प्लॅटफॉर्मवर प्रवेश अधिक नियंत्रित होणार असून, संशयास्पद वस्तू किंवा असुरक्षित सामान रेल्वे परिसरात नेण्यावर आळा बसणार आहे. प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून हा निर्णय घेण्यात आल्याचे मध्य रेल्वे प्रशासनाचे म्हणणे आहे.
दरम्यान, प्रवाशांनी प्रवासाला निघताना वेळेचे योग्य नियोजन करावे आणि बॅग स्कॅनिंग व स्टिकरची प्रक्रिया पूर्ण करूनच प्लॅटफॉर्मवर प्रवेश घ्यावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे. अन्यथा आवश्यक कागदपत्रे आणि तिकीट असूनही प्रवास नाकारला जाऊ शकतो. त्यामुळे आता रेल्वेने घालून दिलेले हे नवे नियम पाळणे प्रत्येक प्रवाशासाठी अनिवार्य ठरणार आहे.


