सातारा प्रतिनिधी
केंद्रीय रस्ते निधीतून सातारा जिल्ह्यासाठी सलग दुसऱ्यांदा मोठा निधी मंजूर करून सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी जिल्ह्याच्या पायाभूत सुविधांना गती दिली आहे. यापूर्वी पहिल्यांदाच जिल्ह्यासाठी तब्बल २१८ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिल्यानंतर, यावेळी आणखी १९२ कोटी रुपयांचा ‘बूस्टर’ निधी मंजूर झाला आहे. या निधीतून जिल्ह्यातील विविध तालुक्यांतील रस्ते मजबुतीकरण, काँक्रीटीकरण तसेच महत्त्वाच्या पुलांच्या बांधकामांना चालना मिळणार आहे.
पाटण तालुक्यात पाटण–मणदुरे मार्गावर तारळे, पाल, काशीळ रस्त्याचे मजबुतीकरण व पुलाच्या बांधकामासाठी ३० कोटी रुपये मंजूर झाले आहेत. सातारा तालुक्यात भोंडवडे, आंबवडे बु., सायळी, वडगाव, सावली, कुरुळबाजी, कुडेघर, रोहोट, पाटेघर, आलवडी, धावली या रस्त्यांसह पुलासाठी ७ कोटी, तर एनएच-४ ते म्हसवे, करंजे ते मोळाचा ओढा, शाहूपुरी पोलीस ठाणे, मतकर कॉलनी, शाहूपुरी चौक, जुना मेढा रोड ते सारखळ रस्त्याच्या काँक्रीटीकरणासाठी २४ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत.
कास परिसरातील घाटाईदेवी फाटा–कास पठार–कास तलाव–कास तलाव भिंत रस्त्यासाठी १० कोटी, कण्हेर–वेळे–कुसुंबी–मोहोट–म्हाते खु.–वागदरे ते मानेवाडी, चोरगेवाडी ते कामथी तर्फ रस्त्याच्या सुधारणा व वायंडिंगसाठी ११ कोटींचा निधी मिळाला आहे. एनएच-४ ते काशीळ कोपर्डे नलवडेवाडी येथे उरमोडी व कृष्णा नदीवरील मोठ्या पुलासाठी २० कोटी रुपये मंजूर झाले आहेत.
जावली तालुक्यात एनएच-४ ते आनेवाडी, सायगाव, मोरघर, वाघेश्वर, भाग आनेवाडी ते वाघेश्वर रस्त्याच्या सुधारणा व वायंडिंगसाठी ३० कोटी, तर गोगवे–वरसोली–गाळदेव–वागदरे–म्हाते–मोहोट–गांजे–तांबी–खरोशी–निझरे–कामथी–वेळे–कण्हेर मार्गावरील कुसुंबी ते वेळे रस्त्यासाठी २५ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. सातारा–कास–बामणोली–गोगवे–तापोळा–महाबळेश्वर रस्त्यावर कास तलाव ते अंधारी फाटा या टप्प्याच्या सुधारण्यासाठी ५ कोटींचा निधी मंजूर झाला आहे.
माण तालुक्यात वाकी ते वरकुटे म्हसवड रस्त्यावर माणगंगा नदीवरील पुलासाठी ८ कोटी, खटाव तालुक्यात कलेढोण जिल्हा हद्द ते वाजेगाव (सांगली) रस्त्याच्या सुधारणेसाठी २ कोटी, तर कराड तालुक्यातील इंदोली–चोरे–पाल रस्त्याच्या सुधारण्यासाठी २० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
मंजूर कामांची निविदा प्रक्रिया व शासकीय सोपस्कार तातडीने पूर्ण करून कामे त्वरीत सुरू करावीत. तसेच ही कामे दर्जेदार व वेळेत पूर्ण व्हावीत, अशा स्पष्ट सूचना ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी हा निधी महत्त्वाचा ठरणार असून, ग्रामीण व पर्यटन क्षेत्रातील दळणवळण अधिक सुलभ होणार आहे.


