सातारा प्रतिनिधी
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या नायगाव (ता. खंडाळा) येथे उभारण्यात येणारे स्मारक समाजातील विषमता, जातिवाद आणि रूढीवादाविरोधातील संघर्षाला नवी दिशा देणारे ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. हे स्मारक केवळ स्मरणचिन्ह न राहता समतेच्या विचारांची बीजे पेरणारे केंद्र बनेल, असे ते म्हणाले.
सावित्रीबाई फुले यांच्या १९५ व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते १४३ कोटी रुपये खर्चून उभारण्यात येणाऱ्या भव्य स्मारकाचे तसेच महिला प्रशिक्षण केंद्राचे भूमिपूजन करण्यात आले. या प्रशिक्षण केंद्रात महिलांसाठी कौशल्यविकास, शिक्षण व रोजगाराभिमुख प्रशिक्षणाच्या सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
मुख्यमंत्री म्हणाले की, महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवून समाजातील अनिष्ट रूढींविरोधात ऐतिहासिक लढा दिला. शिक्षणाचा अधिकार नाकारला गेलेल्या महिलांना मुख्य प्रवाहात आणण्याचे कार्य त्यांनी केले. शासनही त्यांच्या विचारांच्या मार्गानेच काम करीत असून, मुलींना मोफत उच्च शिक्षण देणाऱ्या योजनेला सावित्रीबाई फुले यांचे नाव देण्यात आले आहे. तसेच मोफत उपचार देणाऱ्या जनआरोग्य योजनेला महात्मा फुले यांचे नाव देण्यात आले आहे.
‘लाडक्या बहिणी’ उपक्रमातून महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यावर भर देण्यात येत असून, आतापर्यंत राज्यात ५० लाख ‘लखपती दीदी’ तयार झाल्या आहेत. यावर्षी हा आकडा एक कोटीपर्यंत पोहोचेल, असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. सातारा जिल्ह्यात दीड लाख महिलांनी लखपती दीदीचा दर्जा मिळविला आहे.
नायगाव गावाचे नाव सावित्रीबाई फुले यांच्या नावाने करण्यास ग्रामसभेचा ठराव आल्यास तात्काळ मान्यता देण्यात येईल, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. संत सावता माळी यांच्या अरण येथील स्मारकाचाही भव्य विकास करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाला विधान परिषदेचे सभापती राम शिंदे, मंत्री छगन भुजबळ, जयकुमार गोरे, मकरंद पाटील, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यासह अनेक आमदार, वरिष्ठ अधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.


