सातारा प्रतिनिधी
सातारा येथील पोलीस मुख्यालयाजवळ उभारण्यात आलेल्या अत्याधुनिक ‘वृंदावन पोलीस टाऊनशिप’चे लोकार्पण आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. पोलीस अधिकारी व अंमलदारांसाठी आधुनिक सुविधा असलेली ही टाऊनशिप राज्यातील पोलीस गृहनिर्माणाच्या दृष्टीने एक महत्त्वाचा टप्पा मानली जात आहे.
या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री शंभूराज देसाई, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, जिल्ह्यातील खासदार-आमदार, पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी व मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
पोलीस मुख्यालय परिसरात ब्रिटिशकालीन सुमारे शंभर वर्षे जुन्या कौलारू व बैठ्या चाळीच्या स्वरूपातील निवासस्थाने होती. ही घरे जीर्ण, अपुरी व राहण्यास अयोग्य झाल्याने त्याऐवजी आधुनिक निवासस्थाने उभारण्याचा प्रस्ताव पोलीस अधीक्षक कार्यालयामार्फत पोलीस महासंचालकांच्या माध्यमातून पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळाकडे सादर करण्यात आला होता. या प्रस्तावास प्रशासकीय मान्यता मिळाल्यानंतर या जागेवर नव्या टाऊनशिपची उभारणी करण्यात आली.
या प्रकल्पांत एकूण ६९८ निवासस्थाने उभारण्यात आली असून त्यामध्ये पोलीस अंमलदारांसाठी ६७२, पोलीस अधिकाऱ्यांसाठी २४ निवासस्थाने, तर पोलीस उपअधीक्षकांसाठी दोन स्वतंत्र बंगल्यांचा समावेश आहे. याशिवाय मल्टीपर्पज हॉल, व्यायामशाळा व वाचनालय यांसारख्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
‘वृंदावन पोलीस टाऊनशिप’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या संकुलात पोलीस अधिकारी, अंमलदार, मंत्रालयीन कर्मचारी तसेच सफाई कामगारांना निवासस्थाने देण्यात आली आहेत. संकुलात दोन मेगावॅट क्षमतेचे सबस्टेशन, सांडपाणी व्यवस्थापनासाठी दोन एसटीपी, तसेच घनकचरा व्यवस्थापन युनिट उभारण्यात आले आहे. सुरक्षिततेसाठी संपूर्ण परिसरात सुमारे १०० सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले असून सुरक्षारक्षकांची नेमणूकही करण्यात आली आहे.
पोलीस दलाच्या जीवनमानात सुधारणा घडवून आणणारी ही टाऊनशिप भविष्यात इतर जिल्ह्यांसाठीही आदर्श ठरेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.


