मुंबई प्रतिनिधी
राज्यातील महापालिका निवडणुकांची रणधुमाळी आता निर्णायक टप्प्यात पोहोचली असून, सर्वांचे लक्ष लागलेल्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत उमेदवारांची संख्या स्पष्ट झाली आहे. मुंबई महापालिकेसाठी एकूण २,५१६ उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. निवडणूक आयोगाने केलेल्या छाननीनंतर त्यापैकी १६७ अर्ज अवैध ठरविण्यात आले असून, अखेर २,३४९ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत.
दरम्यान, शुक्रवार, २ जानेवारी हा उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अंतिम दिवस आहे. सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत उमेदवारांना अर्ज मागे घेता येणार आहेत. या टप्प्यावर किती उमेदवार रिंगणातून माघार घेतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. अर्ज मागे घेण्याच्या प्रक्रियेनंतरच खरी लढत कोणकोणामध्ये होणार, याचे चित्र स्पष्ट होणार आहे.
शनिवार, ३ जानेवारी रोजी वैध उमेदवारांना निवडणूक चिन्हांचे वाटप करण्यात येणार असून, त्यानंतर अंतिम उमेदवारांची यादी जाहीर केली जाणार आहे. येत्या १५ जानेवारी रोजी होणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचारयंत्रणा अधिक वेग घेण्याची शक्यता असून, प्रमुख पक्षांसह अपक्ष उमेदवारांचीही ताकद या टप्प्यानंतर स्पष्ट होणार आहे.
मुंबई महापालिकेची निवडणूक ही केवळ स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक नसून, राज्याच्या राजकारणाची दिशा ठरविणारी लढत मानली जात असल्याने पुढील काही दिवसांत राजकीय हालचालींना अधिकच वेग येणार आहे.


