सातारा प्रतिनिधी
सातारा नगरपालिकेतील सत्तासमीकरणांमध्ये भाजपची पकड आणखी मजबूत झाली आहे. पालिका निवडणुकीत अपक्ष म्हणून निवडून आलेले प्रभाग क्रमांक १ मधील शंकर किर्दत आणि प्रभाग क्रमांक ६ मधील रविराज किर्दत यांनी सोमवारी सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या उपस्थितीत भाजपला अधिकृत पाठिंबा जाहीर केला. या घडामोडीनंतर पालिकेच्या सभागृहातील भाजपचे संख्याबळ ४२ वर पोहोचले असून, नगरपालिकेतील सत्ता अधिक स्थिर झाल्याचे चित्र आहे.
सातारा नगरपालिकेच्या नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत खासदार उदयनराजे भोसले आणि मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली भाजपने दमदार कामगिरी करत ४० जागांवर विजय मिळवला होता. मात्र, नऊ जागांवर अपक्ष उमेदवार विजयी झाले होते, तर शिवसेनेला एकाच जागेवर समाधान मानावे लागले होते. निवडणूक निकालानंतर स्पष्ट बहुमत भाजपकडे असले तरी, शहराच्या सर्वांगीण विकासासाठी अधिक व्यापक सहमती निर्माण करण्याचा प्रयत्न भाजप नेतृत्वाकडून सुरू होता.
याच पार्श्वभूमीवर मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी विकासकामांना गती देण्यासाठी अपक्ष नगरसेवकांनी भाजपला पाठिंबा द्यावा, असे आवाहन केले होते. त्या आवाहनाला प्रतिसाद देत शंकर किर्दत आणि रविराज किर्दत यांनी सोमवारी सुरुची येथे मंत्री शिवेंद्रसिंहराजे यांची भेट घेतली. या भेटीत दोन्ही नगरसेवकांनी भाजपला पाठिंबा देण्याची घोषणा केली. मंत्री शिवेंद्रसिंहराजे यांनी त्यांचे अभिनंदन करून स्वागत केले आणि शहराच्या विकासासाठी सर्वांना एकत्र येऊन काम करण्याची गरज असल्याचे नमूद केले.
शंकर किर्दत हे खासदार उदयनराजे भोसले यांचे जुने समर्थक मानले जातात, तर रविराज किर्दत हे मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे विश्वासू सहकारी म्हणून ओळखले जातात. त्यामुळे या पाठिंब्याला केवळ संख्याबळापुरतेच नव्हे, तर राजकीय अर्थानेही महत्त्व प्राप्त झाले आहे.
दरम्यान, भाजपचे वाढलेले संख्याबळ लक्षात घेता आगामी काळात पालिकेतील निर्णयप्रक्रिया अधिक सुलभ होणार असल्याचे बोलले जात आहे. तसेच, इतर काही अपक्ष नगरसेवकही भाजपला पाठिंबा देण्याच्या विचारात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू असून, लवकरच आणखी घडामोडी घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.


