सातारा प्रतिनिधी
सातारा–लोणंद राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ९६५ डीवरील वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर ठोस व कायमस्वरूपी उपाययोजना राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या संदर्भातील महत्त्वपूर्ण बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या अध्यक्षतेखाली झाली. “अपघातांचे वाढते प्रमाण लक्षात घेता, या मार्गाची रचना व वाहतूक व्यवस्थेविषयी सर्वसमावेशक तोडगा काढणे अत्यावश्यक आहे. जनतेच्या सूचनांचा गांभीर्याने विचार करून योग्य उपाय तत्काळ राबवले जातील,” अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
बैठकीस आमदार महेश शिंदे, जिल्हाधिकारी संतोष पाटील, अतिरिक्त जिल्हाधिकारी मल्लिकार्जुन माने, निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व सार्वजनिक बांधकाम विभागाचे वरिष्ठ अधिकारी तसेच संबंधित गावांचे मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वाढे, वडूथ, आरळे, शिवथर आदी दाट लोकवस्तीच्या भागातून जाणाऱ्या या महामार्गावर अनेक धोकादायक वळणे असून वारंवार अपघातांची नोंद होत आहे. अनेकांना आपला जीव गमवावा लागल्याची बाब स्थानिकांनी बैठकीत मांडली. या समस्येची गंभीर दखल घेत मंत्री शिवेंद्रसिंहराजे यांनी बायपास रस्ते, धोकादायक वळणांवरील सुरक्षा उपाय, रस्त्यांचे रुंदीकरण, सूचना फलक, वाहतूक नियंत्रण व रस्त्यांच्या दर्जा सुधारणा यांसारख्या उपाययोजना तातडीने हाती घेण्याचे स्पष्ट निर्देश संबंधित विभागांना दिले.
यावेळी सातारा–लोणंद महामार्गावरील प्रलंबित पुलांची कामे, रस्त्यांची सद्यस्थिती आणि आगामी विकास आराखड्याचा सविस्तर आढावा घेण्यात आला. “अपघातमुक्त आणि सुरक्षित प्रवास हा शासनाचा प्राधान्यक्रम असून, या मार्गावरील कामांना गती देत नागरिकांना दिलासा मिळेल,” असा विश्वास शिवेंद्रसिंहराजेंनी व्यक्त केला.


